अहमदनगर : मुळा धरणातून शेतीला पाण्याचे आवर्तन देण्याबाबत सोमवारी नाशिकला महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मनोहर पोकळे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत जायकवाडीला सोडण्यात आलेल्या पाण्याचा आढावा घेऊन ‘मुळा’च्या आवर्तनासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीकडे मुळा धरणाच्या आवर्तनावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.मुळा धरणातून जायकवाडीला १ हजार ७४० दशलक्ष घनफूट पाणी देण्यात येत आहे. यामुळे मुळा धरणातील शेतीच्या पाण्याच्या आवर्तनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जायकवाडीला पाणी दिल्यानंतर मुळा धरणात १३ हजार ४०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहणार आहे. यातून ४ हजार ५०० मृतसाठा, ८ पाणी योजना, वांबोरी, सोनई, भेंडा या गावांना पिण्यासाठी पाणी व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे राखीव पाणी, बाष्पीभवन असे आॅगस्ट २०१६ अखेर ५ हजार दशलक्ष घनफूट पाणी नियोजित आहे. यातूनही धरणात ३ हजार ५०० ते ४ हजार दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहणार आहे. या पाण्यातून शेतीसाठी आवर्तन शक्य असल्याचा अहवाल यापूर्वी जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. मुळा धरणातील एकूण पाण्याचे आॅगस्ट २०१६ पर्यंत नियोजन झालेले आहे. नगरला झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जायकवाडीला पाणी देऊन झाल्यावर शिल्लक राहणाऱ्या पाण्यातून शेतीसाठी आवर्तन द्यावे, अशी जोरदार मागणी झालेली आहे. यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी पाटबंधारे विभागाने सोमवारी नाशिकला बैठक बोलावली आहे. या वेळी जायकवाडीला सोडण्यात आलेल्या पाण्यावर आढावा घेऊन धरणात शिल्लक राहिलेल्या पाण्याच्या नियोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे मुळा धरणातील आवर्तनाचा निर्णय सोमवारी होणार आहे. या वेळी जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
‘मुळा’च्या आवर्तनाबाबत सोमवारी अंतिम निर्णय
By admin | Published: November 15, 2015 2:33 AM