मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाविरोधात महाआघाडी उभारण्याच्या काँग्रेस - राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. याबाबतच्या चर्चेत शुक्रवारी घटकपक्षांसाठी तीन जागा सोडण्याची तयारी दाखवितानाच, एमआयएमला सोडचिठ्ठी दिली, तरच भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घेण्याबाबत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.महाआघाडीबाबत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या वेळी जागावाटप आणि जागांच्या अदलाबदलीविषयी चर्चा झाली. घटकपक्षांसाठी पालघर लोकसभा बहुजन विकास आघाडी, अकोला लोकसभा भारिप बहुजन महासंघ आणि हातकणंगले मतदार संघ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्याबाबत चर्चा झाली. मात्र, प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत यायचे असेल, तर एमआयएमची साथ सोडावी लागणार आहे. आंबेडकर यांनी मात्र अद्याप यावर आपली भूमिका स्पष्ट केली नाही. घटकपक्षांसाठी तीन जागा सोडण्याची तयारी दोन्ही पक्षांनी दाखविली असली, तरी अन्य पक्षांनी अधिक जागांसाठी आग्रह धरला आहे. आरपीआय गवई गटाच्या राजेंद्र गवई यांनी अमरावतीसाठी आग्रह धरला आहे. मात्र, पंजा किंवा घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची तयारी असेल, तरच जागा सोडू, अशी भूमिका आघाडीच्या नेत्यांनी घेतली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने किमान समान कार्यक्रमाबाबत आग्रह धरला आहे. शेकाप, डाव्या संघटना, लोकतांत्रिक जनता दल आदींना विधानसभेसाठी संधी देण्याची चर्चा झाली.राहुल गांधी, शरद पवार यांच्या पातळीवर चर्चामहाआघाडीची राज्य पातळीवरील चर्चा संपली आहे. आता महाआघाडीबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीत होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. महाआघाडीबाबत जी चर्चा झाली, ती आम्ही पक्ष प्रभारींना सांगू. प्रकाश आंबेडकरांबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आाहे. आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत राहुल गांधी, शरद पवार यांच्या पातळीवर चर्चा होईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
महाआघाडीचा अंतिम निर्णय होणार दिल्लीत, घटकपक्षांना तीन जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 6:12 AM