लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहराच्या विकासाला शिस्त लावून दिशा दाखविण्यासाठी आणलेला विकास नियोजन आराखडाच मार्ग भरकटला आहे. निवडणुकीच्या काळात लांबणीवर पडलेल्या या आराखड्याला अद्याप मुहूर्त नाही. अखेर दोन वेळा मुदतवाढ मिळूनही विकास आराखड्याचे गणित काही नगरसेवकांना सुटलेले नाही. त्यामुळे अखेर १८ जुलैपर्यंत पालिका महासभेत आराखड्याला मंजुरी देऊन मोकळा होण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत आज घेण्यात आला.सन २०१४-२०३४ या २० वर्षांचा विकास आराखडा गेली दोन वर्षे मंजुरीसाठी रखडला आहे. विकास नियोजन आराखड्याच्या मसुद्यावर कळकळ व्यक्त करत अभ्यासासाठी राज्य सरकारकडून दोन वेळा नगरसेवकांनी मुदतवाढ मिळवली. मात्र या कालावधीत केवळ २२ नगरसेवकांनी विकास आराखड्यावर सूचना व हरकती नोंदवल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या काळात हा आराखडा लांबणीवर टाकण्यात आला. त्यानंतरही नगरसेवकांच्या मागणीनुसार पालिका प्रशासनाने चार वेळा आराखड्याचे सादरीकरण केले. मात्र त्यानंतर १०९ नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विशिष्ट तक्रारी आणल्या. त्यातही २२ नगरसेवकांनी सूचना व हरकती नोंदवल्या. मात्र या विलंबामुळे विकास आराखडा लांबणीवर पडत असल्याने तिसरी मुदत म्हणजेच १८ जुलैआधी महासभेत यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचे गटनेत्यांनी निश्चित केले आहे.
विकास आराखड्यावर होणार अंतिम निर्णय
By admin | Published: July 11, 2017 2:42 AM