मुंबई : नाशिक-अहमदनगर आणि मराठवाडा पाणी वाटपाबाबत उच्च न्यायलयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील अंतिम सुनावणी २ मार्च रोजी होणार आहे.मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पुरेसे पाणी असल्याने नाशिक-नगरच्या धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये, यासाठी नाशिक-नगरच्या रहिवाशांनी व साखर कारखारनदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. तर मराठवाड्याला पिण्यासाठीही पुरेसे पाणी नसल्याने नाशिक-नगरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे सुरू आहे. सोमवारच्या सुनावणीवेळी खंडपीठाने सर्व याचिकाकर्त्यांना आणि प्रतिवाद्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश देत, या सर्व याचिकांवरील अंतिम सुनावणी २ मार्च रोजी ठेवण्यात येत आहे, असे सांगितले.गेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने राज्य सरकारला नाशिक-नगरच्या धरणांत आणि मराठवाड्यातील जायकवाडी धरणात किती पाणी शिल्लक आहे, याची तपशीलवार माहिती सादर करण्याचा तसेच जोपर्यंत ही माहिती देण्यात येत नाही तोपर्यंत नाशिक- नगरच्या धरणांतून २.४४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडू नका, असा आदेश खंडपीठाने सरकारला दिला होता.सरकारी वकिलांनी ही माहिती खंडपीठासमोर सादर केली नाही.
मराठवाडा पाणीवाटपाबाबत अंतिम सुनावणी २ मार्चला
By admin | Published: January 12, 2016 3:08 AM