'राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर उद्या आणि परवा अंतिम सुनावणी', राहुल नार्वेकरांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 06:13 PM2024-01-29T18:13:29+5:302024-01-29T18:13:51+5:30
'उद्धव ठाकरेंचे माझ्यावर विषेश प्रेम आहे.'
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल 15 फेब्रुवारीपर्यंत द्या, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना दिले आहेत. याबाबत नार्वेकरांनी आज महत्वाची माहिती दिली.
माध्यमांशी संवाद साधताना नार्वेकर म्हणाले की, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याचिकेसंदर्भात आजची सुनावणी पूर्ण झाली असून, आम्ही आजच आम्ही दोन्ही बाजुचा एव्हिडेन्स क्लोज केलेला आहे. उद्या आणि परवा यावर अंतिम सुनावणी होईल आणि 31 तारखेला हे प्रकरण क्लोज होईल. मला खात्री आहे 15 फेब्रुवारीच्या आत अंतिम निर्णय जारी केला जाईल,' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
'उद्धव ठाकरेंचे माझ्यावर विषेश प्रेम'
देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नेमणूक करण्यात आली आहे, त्यावरुन विरोधक सत्ताधारी भाजपावर निशाणा साधत आहेत. दरम्यान, नार्वेकरांची निवड हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का?; उद्धव ठाकरेंचा सवाल
याबाबत बोलताना नार्वेकर म्हणाले की, अशा मोठ्या पदावर राज्यातील एखादा व्यक्तीीची निवड झाल्यावर, राज्यासाठी हा मोठा क्षण असतो. पण, उद्धव ठाकरेंचा राज्याची अस्मिता आणि राज्यातील बांधवाबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा वेगळा अंदाज असेल. त्यामुळे मी त्यांच्या शुभेच्छांसाठी त्यांना धन्यवाद करतो. त्यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे,' असा टोला नार्वेकरांनी लगावला.