रत्नागिरी : युरोपीय देशांनी आंबा निर्यातीवरील बंदी उठविताना काही अटी ठेवल्या होत्या. निर्यातीपूर्वी आंब्यावर उष्णजल प्रक्रियेचा पर्याय सुचविण्यात आला होता, परंतु उष्णजल प्रक्रियेसंबंधी सुरू असलेले संशोधन अजूनही पूर्ण झालेले नाही. ते अंतिम टप्प्यात आले असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती पणन विभागाने दिली.निर्यातीपूर्वी आंबा उष्णजल प्रक्रियेमधून ४८ डिग्री सेंटिग्रेड तापमानात ६० मिनिटे ठेवला तर त्यावरील फळमाशी नष्ट होते. मात्र, त्यासाठी फळमाशी तयार करण्यापासूनच संशोधन हाती घेण्यात आले. हे संशोधन आता अंतिम टप्प्यात आले असून, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते पूर्ण होईल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.हापूस आंब्याची साल पातळ असल्याने ४८ डिग्री सेंटिग्रेड तापमानात ६० मिनिटे आंबा ठेवल्यानंतर आंब्यावर काय परिणाम होईल, आंब्याचा दर्जा व चव टिकून राहील का, याबाबत संशोधन सुरू आहे. सध्या ४८ डिग्री सेंट्रिग्रेड तापमानात ५१ मिनिटांपासून ६० मिनिटांपर्यंत नऊ गटांत वर्गवारी करून संशोधन सुरू आहे. आंब्यावर होणारा परिणाम व फळमाशी नष्ट होण्याची प्रक्रिया याबाबतच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. संशोधन पूर्ण होताच याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. यावर्षीचा आंबा हंगामही आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे हे संशोधन पुढील काळासाठीच वापरावे लागणार आहे. (प्रतिनिधी)उष्णजलऐवजी बाष्पजलउष्णजल प्रक्रियेचे संशोधन अजून सुरूच असल्याने यावर्षी युरोपला पाठविण्यात आलेला आंबा बाष्पजल प्रक्रिया करून पाठविण्यात आला होता. अर्थात हा पर्याय म्हणून यंदा वापरला असला, तरी उष्णजल प्रक्रियेवरील काम प्राधान्याने सुरू आहे आणि ही प्रक्रिया यशस्वी झाल्यास तीच पुढील काळात वापरली जाणार आहे.
उष्णजल संशोधन अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2015 11:33 PM