ज्ञानेश्वर मुंदे,
यवतमाळ- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य पदासाठी दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल घोषित झाला असून राज्यातील तब्बल १०८ आयटीआय निदेशक प्राचार्यपदी नियुक्त होणार आहेत. गत तीन वर्षांपासून शासनाच्या वेळकाढू धोरणाने या नियुक्त्या रखडल्या होत्या, हे विशेष!उद्योगास कुशल मनुष्यबळ तयार व्हावे, सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य विकासाचे धडे मिळावे यासाठी शासनाने कौशल्य विकास आणि उद्योजकता हे नवीन खाते तयार केले आहे. या अंतर्गत राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम शिकविले जातात. परंतु राज्यातील ४० टक्क्यांपेक्षा अधिक आयटीआयमध्ये प्राचार्य पद रिक्त होते. २००१ पासून सरळ सेवेने प्राचार्य पद भरण्यात आले नव्हते. त्यामुळे विविध अडचणी निर्माण होत होत्या. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) या पदासाठी आॅक्टोबर २०१३ मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली. मार्च २०१४ मध्ये या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. महाराष्ट्र शिक्षणसेवा गट अ, गट अ (कनिष्ठ) आणि गट ब च्या विविध पदांसाठी ही भरती होती. मात्र निकाल घोषित होत नव्हता. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. अखेर दोन वर्षानंतर आॅगस्ट २०१५ मध्ये या परीक्षेचा निकाल लागला. उद्योजकता विकास विभागास एमपीएससीने उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्याचे सुचविले. परंतु वर्ष लोटूनही या निदेशकांना प्राचार्यपदाची नियुक्ती दिली जात नव्हती. राज्यातून या परीक्षेत १०८ आयटीआय निदेशक प्राचार्य पदासाठी पात्र झाले होते. त्यात यवतमाळ येथील संदीप बोरकर, वणी येथील गजानन राजूरकर आणि राहुल पळवेकर यांचा समावेश होता. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही उपयोग होत नव्हता. अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी यासाठी पुढाकार घेतला. अखेर ३१ आॅगस्ट रोजी शासनाच्या संकेतस्थळावर या सर्वांची अधिकृत नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली. येत्या आठ दिवसात १०८ उमेदवार प्राचार्यपदी नियुक्त होणार आहेत.केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने मेक इन इंडिया धोरण राबविले जात आहे. तरुणांना किमान कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. परंतु प्राचार्याअभावी आयटीआयचे काम ढेपाळले होते. आता या नियुक्तीमुळे हा मार्ग मोकळा झाला आहे.