मुंबईसह राज्याच्या काही भागांत जबर पाऊस सुरू आहे. मुंबई शहरासह उपनगरातही दमदार पाऊस होत आहे. याच बरोबर, पुढील चार दिवस राज्यासाठी मुसळधार पावसाचे असणार असून मुंबई आणि कोकणासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यातच, मुंबईतील पावसाची स्थिती आणि त्यासंदर्भात कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री आता रस्त्यावर उतरले आहेत. यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न घेता खोचक टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विट रीट्विट करत, "अखेर अडीच वर्षानंतर घराबाहेर पडणारा, मैदानात उतरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला...," असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे. भातखळकर यांनी रीट्विट केलेल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील पावसाचा आणि त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेताना दिसत आहेत.
मुख्यमंत्र्यांचे ट्विट - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत, बीएमसीच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन मुंबईतील पावसाची परिस्थिती, तसेच यासंदर्भात कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी, मुंबई मनपा आयुक्त इकबालसिंह चहल यांनी मुंबईतील पावसाची सद्यस्थिती आणि पालिकेने केलेल्या उपाययोजना यांची सविस्तर माहिती दिली, असे म्हटले होते.
दुपारी मोठी भरती येण्याचा अंदाज - मुंबईच्या समुद्रात दुपारी ४ वाजून ४९ मिनिटांनी मोठी भरती येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात ३.२७ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे दुपारपर्यंत पाऊस कायम राहिल्यास सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे.