मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला मुंबई विद्यापीठाचा प्रलंबित निकालाचा गोंधळ, अखेर संपुष्टात आला आहे. मंगळवारी विद्यापीठाने उर्वरित ५ निकाल जाहीर करीत, एकूण सर्व ४७७ परीक्षांचे निकाल जाहीर केले. मंगळवारी रात्री आयडॉलचे वाणिज्य शाखेचे २ निकाल जाहीर केल्यानंतर, प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असून, विद्यार्थ्यांवरील तणाव काही प्रमाणात कमी झाला आहे.आता प्रामुख्याने पुनर्मूल्यांकनाचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आव्हान विद्यापीठावर आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार, परीक्षा झाल्यावर ४५ दिवसांच्या आत निकाल लावावे लागतात, पण आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यापीठाच्या निकालाला लेट मार्क लागला होता. अनेक ‘डेडलाइन’ उलटून गेल्या. या गलथानपणामुळे विद्यापीठाच्या बेअब्रूबरोबरच कुलगुरू डॉ. संजय देशमुख, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली होती.मंगळवार दुपारपर्यंत आयडॉलच्या टी.वाय.बीकॉम आणि एम. कॉमच्या चौथ्या सत्राचे निकाल बाकी होते. त्यामुळे सुमारे साडेतेरा हजार विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले नव्हते, पण मंगळवारी रात्री उशिरा विद्यापीठाने संकेतस्थळावर हे दोन्ही निकाल जाहीर करून, सर्व ४७७ निकालांचा आकडा पूर्ण केला.मुंबई विद्यापीठातर्फे यंदा आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी करण्यात आली. लवकर निकाल लावण्यासाठी या पद्धतीचा वापर करण्यात आल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले होते, पण याचे उलट परिणाम दिसून आले. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकलांना लेटमार्क लागला, पण आता निकाल लागल्याने विद्यापीठाचे टेन्शन कमी झाले आहे.निकाल लागले असले, तरीही मुंबई विद्यापीठाची परीक्षा अजून संपलेली नाही. कारण निकालातील त्रुटींमुळे पुनर्मूल्यांकनाचा आकडा बराच वाढला आहे. या उत्तरपत्रिकांची योग्य प्रकारे तपासणी करून विद्यापीठाला लवकर निकाल जाहीर करावे लागणार आहेत.।प्रभारी खांद्यावर किती दिवस चालणार कारभार?मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उतरपत्रिका तपासणीच्या निर्णयामुळे, कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपाल यांनी कारणे दाखवा नोटीस दिली होती आणि कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. तेव्हापासून कुलगुरू, प्र- कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक ही सर्व पदे प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. या सर्व पदाची नियुक्ती निकाल लागेपर्यंत अथवा तीन महिने करण्यात आली होती.आता निकाल जाहीर झाले आहेत, तर दुसरीकडे कुलगुरूंनी राज्यपालांना ३ हजार शब्दांचे पत्रदेखील दिले आहे. त्यामुळे आता कुलगुरू डॉ. संजय देशमुख पुन्हा कार्यभार कधी स्वीकारणार की, विद्यार्थी संघटनांचा विरोध असल्यामुळे नक्की काय होणार, यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अखेर सर्व निकाल जाहीर, पुनर्मूल्यांकनाचे आव्हान; ४ महिन्यांनंतर ४७७ निकाल लावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 6:56 AM