ऑनलाइन लोकमतबीड, दि. 16 - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्जप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांवर मंगळवारी अंबाजोगाई येथील अपर व सत्र न्यायालयाचे न्या. एन. एस. कोले यांनी जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करतांना अनेक अटी व शर्थीचे पालन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. परळी तालुक्यातील संत जगमित्र नागा सूतगिरणीतील १२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार व बँकेची केलेली फसवणूक या संदर्भात धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात अंतरिम जामीन मिळावा यासाठी त्यांनी अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांच्या न्यायालयासमोर जामीन अर्ज दाखल केला होता. तब्बल दोन महिने विविध कारणांमुळे जामाीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली होती. अखेर मंगळवारी मुंडे यांना २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर व पुढील काळात चौकशीसाठी सहकार्य करावे, संपत्तीचे पूर्ण विवरण तपासी अधिकाऱ्यांना द्यावे या अटीसह जामीन मंजूर झाला. विधान परिषदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अधिवेशन काळात या जामीनअर्जावर युक्तिवाद व विविध कारणांमुळे दोन महिने ही प्रक्रिया सुरूच राहिली होती. १२ आॅगस्ट रोजी धनंजय मुंडे यांच्या वतीने उज्जवल निकम यांचे सुपुत्र अनिकेत निकम यांनी मुंडे यांची बाजू न्यायालयासमोर भक्कमपणे मांडली होती. तर त्यांना अॅड. अण्णासाहेब लोमटे यांनी सहकार्य केले. अंबाजोगाई न्यायालयासमोर जिल्हा बँकेच्या संदर्भाने जामीनसाठी वीस अर्ज आहेत. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले.
अखेर धनंजय मुंडे यांना जामीन
By admin | Published: August 16, 2016 8:03 PM