पुणे : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होणार नाही हे जवळपास नक्की झाल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी नातेवाईक तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या जागांचा आग्रह धरल्यामुळे त्यांच्यातील बोलणी फिसकटली असल्याचे समजते. आघाडी तुटली असे कोणी जाहीर करायचे यावरून आता दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष मौन बाळगून आहेत.लोहियागर प्रभागातील चारही जागा काँग्रेसला हव्या आहेत. मावळत्या सभागृहात तिथे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिना मोमीन या महिला नगरसेविका आहेत. ती जागा सोडायला राष्ट्रवादी काँग्रेस तयार नाही. कोंढवा प्रभागात काँग्रेसच्या रईस सुंडके यांना पक्षात प्रवेश देऊन आता तेथील सर्व जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस हक्क सांगत आहे. काँग्रेसचेच माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांच्याही जागेवर त्यांना पक्षात प्रवेश देत राष्ट्रवादीने हक्क सांगितला आहे. काँग्रेसला ते मान्य नाही. शिवाजीनगर मधील काँग्रेसचे उपमहापौर मुकारी अलगुडे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके आहेत. ही जागा काँग्रेसने मागितली आहे. (प्रतिनिधी)
पुण्यात अखेर दोन्ही काँग्रेसची आघाडी तुटली
By admin | Published: February 01, 2017 2:17 AM