मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर उद्या होणार आहे. याबाबची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारातभाजपाकडून 5 ते 6 तर शिवसेनेकडून दोन मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रिपदाचा समावेश असेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नीति आयोगाच्या बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे'. दरम्यान, याआधी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अनेक वावड्या उठत असतानाच, स्वत: मुख्यमंत्र्यांनीच ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती.
सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी विस्तार होईल, असे मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केले होते. यावरून पतंगबाजी सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखे यांना मंत्रीपद देण्यास भाजपामधील निष्ठावंतांचा विरोध असल्याची चर्चा आहे. मात्र, विखे व मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे मंत्रीपद निश्चित असल्याचे समजते. अनिल बोंडे व संजय कुटे यांच्यापैकी एक, तर शिवाजीराव नाईक व अतुल सावे यांच्यापैकी एक अशा दोघांना संधी मिळू शकते. रामदास आठवले यांच्या रिपाइंला एक मंत्रीपद मिळू शकेल.
शिवसेनेतही राजकीय रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद हवे आहे. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त करून, शिंदे यांनी काही आमदारांसह मातोश्रीवर शक्तिप्रदर्शन केले. शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास रामदास कदम, सुभाष देसाई व दिवाकर रावते यांचा विरोध असल्याचे समजते. त्यामुळे शिवसेना उपमुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरण्याची शक्यता कमी आहे.
शिवसेनेला दोन मंत्रीपदे शिवसेनेच्या कोट्यातील एक मंत्रीपद रिकामे असून राष्ट्रवादीतून सेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना ते मिळू शकते. दोन मंत्रीपदे मिळावीत असा सेनेचा आग्रह आहे. याच पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचे म्हटले आहे.