जमीर काझी / मुंबईतरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून मारहाण करीत गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी, पोलीस कॉन्स्टेबल तुषार मारुती तिऊरवडे (वय ३२, रा. गोविंदजी केणी रोड, भोईवाडा पोलीस लाइन, भोईवाडा) याच्याविरुद्ध अखेर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिऊरवडे हा सशस्त्र दल (एल-१) नियुक्तीला असून, सहआयुक्त (प्रशासन) यांच्याकडे ‘आॅर्डर्ली’ म्हणून काम करीत असताना, त्याने विवाहित तरुणीशी जवळीक साधली होती.याबाबत तरुणीने तक्रार करूनही वरिष्ठाकडून कारवाई होत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ फेबु्रवारीला प्रसिद्ध केले होते. त्यानंतर, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविला. या शाखेतील महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाकडून सविस्तर चौकशी करण्यात आली. त्यानंतर, शनिवारी रात्री उशिरा तिऊरवडे विरुद्ध बलात्कार, भू्रणहत्या व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम ३७६, ३१५, गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याणमध्ये राहात असलेल्या धनश्री ( बदलले नाव) या तरुणीच्या नवऱ्याने परस्पर दुसऱ्याशी विवाह केल्याने, त्याबाबत तक्रार देण्यासाठी आली असता, कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडे तिच्या संपर्कात आला. पती घटस्फोट देणार असल्याने तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवित शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून गर्भवती झाल्यावर धनश्रीने लग्नाचा आग्रह धरल्यानंतर टाळाटाळ करू लागला. तिला मारहाण करून गर्भपात घडविला. पोलीस मित्र संतोष कदम याच्या सहकार्याने दमदाटी करीत, दोघांनी या प्रकरणाची कोठेही वाच्यता न करण्यास तिला धमकाविले. त्याचप्रमाणे, कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नावाचा वापर करून भोईवाडा पोलिसांकडून खोटी कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार देऊनही काहीच कार्यवाही न झाल्याने, पीडित तरुणीने ‘लोकमत’कडे व्यथा मांडल्या. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविली, तर सहआयुक्त (प्रशासन) अनुपकुमार सिंग यांनी त्याला आपल्या कार्यालयातून परत ‘एल’ विभागाकडे पाठविले होते. कॉन्स्टेबलच्या पत्नीची पोलीस ठाण्यात धमकीमहिला उपनिरीक्षक देशमुख यांच्यासमोर आपल्याजवळ येऊन त्याने आपल्याला जिवंत जाळण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलीस आयुक्तांना त्याबाबत मेसेज, तसेच कंट्रोलरूमला फोन करून कळविले. त्यांच्या सूचनेनंतर तरुणीने या घडलेल्या प्रकाराबाबत स्वतंत्र तक्रार पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी फिर्यादीमध्ये संतोष कदमने दिलेल्या त्रासाचा उल्लेख टाळला आहे. याबाबत पोलीस आयुक्त पडसलगीकर यांना सांगितले असून, त्यांनी परिमंडळ-४चे उपायुक्त अंबिका यांना भेटून पुन्हा जबाब देण्यास सांगितले आहे.-पीडित तरुणी