Manoj Jarange Patil Dasara Melava: सगेसोयरेंची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीतून मराठा आरक्षण मिळण्यासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सुरू केलेले उपोषण स्थगित केले. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातच आता मनोज जरांगे दसरा मेळावा घेणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूर येथे विजयादशमी मेळावा होतो. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेतात. शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दसरा मेळावा घेऊन संबोधित करतात. तर पंकजा मुंडे या बीड येथे दसरा मेळावा घेतात. यात आता मनोज जरांगे पाटील यांची भर पडणार असल्याचे सांगितले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यासाठी एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.
१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा
एकीकडे बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे दरवर्षी दसरा मेळावा होतो, त्यात आता मनोज जरांगे पाटील यांचा दुसरा दसरा मेळावा नारायणगड येथे होणार आहे. नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. दर्शन घेण्यासाठी मी जाणार आहे. मराठा समाजाने प्रचंड संख्येने नारायण गडावर यायचे आहे. सर्वांनी एकजूट दाखवायची आहे. नारायण गडावर राजकीय बोलणे किंवा निर्णय होणार नाही. अशी एकजूट आणि शक्ती दाखवा, अशी की पुन्हा अशी एकजूट असणार नाही. दसरा मेळाव्याला जाणार आणि बोलणार पण आहे. दसरा मेळाव्याला तुफान वेगाने मराठा समाज येणार आहे. दसऱ्याच्या दिवशी १२ वाजता नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. वेळ १२ वाजेची वेळ ठरलेली आहे. येणाऱ्या सर्व भक्तांना माझी विनंती आहे दर्शन जरी सर्वांचे झाले. तरी २ वाजेपर्यंत गडावरच राहायचे आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
दरम्यान, मी राजकीय भाषा करीत नाही आणि राजकारण करणार नाही. सरकारने केवळ आमच्या मागण्या पूर्ण करा एवढेच देवेंद्र फडणवीस यांना सांगणे आहे. सरकारने अभ्यासकांना बोलावल्याचे सांगितले आहे. आता सरकारला कशाला अभ्यासक पाहिजे. सरळ सांगतो सरकारला अभ्यासक बोलावण्याचे नाटके बंद करा. १३ महिने झाले सरकार अभ्यासकांशी चर्चा करीत आहेत. हा जर तुमचा ट्रॅप असेल तर सरकारला काहीही मिळणार नाही. आम्ही आमच्या मागण्यावर ठाम राहणार आहोत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, यासह अन्य मागण्या मंजुर कराव्यात अन्यथा आगामी निवडणूक घेऊन तुम्हाला पश्चाताप होईल, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.