ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - सकल मराठा समाजाच्या क्रांती मूक मोर्चाबद्दल छापण्यात आलेल्या वादग्रस्त व्यंगचित्र प्रकरणी अखेर सामनामधून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. व्यंगचित्रकार प्रभुदेसाईंकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली असून यासंबंधी वृत्त आजच्या अंकात छापण्यात आलं आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असा खुलासा व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी केला आहे.
‘सामना’च्या ‘उत्सव’ पुरवणीतील माझ्या एका व्यंगचित्राने सध्या काहूर माजले आहे. विशेषत: मराठा समाजाच्या भावना व्यंगचित्रामुळे दुखावल्या व त्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं श्रीनिवास प्रभुदेसाई बोलले आहेत.
‘‘व्यंगचित्राचा वाद अकारण आहे. मी एक कलावंत असलो तरी राजकीय व्यंगचित्रकार नाही. धकाधकीच्या जीवनात लोकांना दोन विरंगुळ्याचे क्षण मिळावेत म्हणून व्यंगचित्रे काढतो व त्या सदराचे नाव म्हणूनच ‘हसोबा प्रसन्न’ आहे. २५ सप्टेंबरचे व्यंगचित्र मराठा समाजाला खटकले. मात्र कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता हेही नम्रपणे सांगतो. या सर्व प्रकरणाचे राजकारण झाले व त्यात ‘शिवसेना’ व ‘सामना’स ओढण्याचा प्रयत्न काही लोकांनी केल्यामुळेच हा खुलासा करीत असल्याचे श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’त प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त व्यंगचित्रामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. बुलडाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह आ. संजय रायमूलकर (मेहकर) आणि आ. शशिकांत खेडेकर (सिंदखेडराजा) यांनी निषेध करत आपल्या पदाचे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले.
इरादे मेरे हमेशा साफ होते है...
‘इरादे मेरे हमेशा साफ होते है, इसलिए कई लोग मेरे खिलाफ होते है’ अशा आशयाचा सूचक मजकूर ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी फेसबूकवर शेअर केला. राऊत अनेक वेळा माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रि या देतात. या वेळी मात्र त्यांनी दोन दिवसांनंतरही मौन बाळगणे पसंत केले.
हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा विघ्नसंतोषीपणा : देसाई
सामनामधील व्यंगचित्राचा वाद निवळलेला असताना वातावरण पुन्हा पेटविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस करीत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकाद्वारे केला. या दोन पक्षांच्या नेत्यांनी गेली १५ वर्षे सत्ता भोगताना मराठा समाजासाठी कोणतीही ठोस योजना आणली नाही. आरक्षणाचा फार्स केला. ही नामुष्की लपविण्यासाठी आता ते शिवसेनेवर आगपाखड करीत आहेत. मराठा क्रांती मोर्चांमध्ये डौलाने फडकणारे भगवे झेंडे विरोधी पक्षांना बघवत नसावेत. विरोधकांचा विघ्नसंतोषीपणा जनता खपवून घेणार नाही व मराठावीर विचलित होणार नाहीत, असे देसाई यांनी म्हटले आहे.
सामना कार्यालयांवर हल्ला
नवी मुंबईतील वाशी इथल्या ‘सामना’च्या कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली. तर ठाण्यातील कार्यालयावर शाईफेक करण्यात आली. इतकंच नाही वादग्रस्त व्यंगचित्रामुळे ठिकठिकाणी ‘सामना’ पेपर जाळून निषेध नोंदवला जात आहे.
माफी मागण्याचा प्रश्नच नाही: शिवसेना
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी व्यंगचित्राचा वाद राजकीय फायद्यासाठी पेटवत आहे. त्यामुळे याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.