मुंबई : काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या नाराज आमदारांची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निकालानंतर त्यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला होता.
गेल्या काही वर्षांपासून राधाकृष्ण विखे पाटीलभाजपात जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मुख्यमंत्र्यांसोबतची वाढती जवळीकही तेच दर्शवत होती. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा मुलगा सुजय विखे यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेस राष्ट्रवादीसेबत मतभेद झाले होते. अहमदनगर राष्ट्रवादीकडे असल्याने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना राष्ट्रवादीकडून तिकीट घेण्यास सांगितल्याचा दावा विखे यांनीच केला होता. यामुळे सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश करत अहमदनगरची उमेदवारी मिळविली होती.
लोकसभा निवडणुकीवेळी विखे पाटलांनी प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ते अहमदनगरमध्येच तळ ठोकून होते. सुजय विखेंसाठी त्यांनी फिल्डींग लावली होती. सुजय खासदार झाल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगू लागली आहे. विखे पाटलांच्या मुंबईतील निवासस्थानी आज काँग्रेसचे नाराज आमदार दाखल झाले होते. यामध्ये अब्दुल सत्तार, भारत भालके, शिवसेनेचे नारायण पाटील आणि माढाचे रणजित निंबाळकर उपस्थित होते. यावेळी पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली.
अखेर राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. बैठकीनंतर विधानसभा भवनात दाखल होत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे विखे पाटलांनी आमदारकीचा राजीनामा सोपविला आहे.
माझ्या सोबत कुणीही नाही. ज्यांची नावे घेतली जात आहेत ते केवळ माझे मित्र आहेत. त्यांची उगाच नावे घेणे योग्य नाही. भाजपमध्ये कधी प्रवेश करणार हे लवकरच जाहीर करेन. मात्र, मंत्रिपद देणार की नाही हा निर्णय त्या पक्षाचा असेल, असे राजीनामा दिल्यानंतर विखे पाटलांनी स्पष्ट केले.
सत्तारांना विरोध?विखे पाटलांसोबत आमदार अब्दुल सत्तारही भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांच्या प्रवेशाला भाजपातून विरोध होत असल्याचे समजते आहे. राज्यात पुढील तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार असून यामुळे विखे पाटलांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. 17 जून रोजी पावसाळी अधिवेशन होणार असून त्याआधीच सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.