मनोज कुंभार,मार्गासनी- ‘वेल्ह्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच तालुका प्रशासन खडबडून जागे झाले. सभापती सीमा राऊत यांनी बातमीची गंभीर दखल घेतली असून, संबंधित शिक्षकांची चौकशी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने संबंधित केंद्रप्रमुख यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. शालेय कामकाजाच्या वेळेत न येणाऱ्या संबंधित शिक्षकांना ‘कारणे दाखवा नोटिसा’ काढल्या आहेत. त्यावर प्रशासनकडून खुलासा मागितला असल्याची माहिती गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी व शिक्षण विस्तार अधिकारी सुनील मुगळे यांनी दिली.१८ मार्चला ‘लोकमत’मध्ये ‘वेल्ह्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या अगोदर अठरा गाव मावळ परिसरात जिल्हा परिषद शाळांची ‘लोकमत’ने पाहणी केली होती. एकमेकांच्या संगनमताने शाळेवर फक्त रजेचा अर्ज ठेवून शासनाची फसवणूक करतात. लोकमत पाहणीत एक शाळा बंद व दुसऱ्या दोन शाळा विद्यार्थीच चालवत असल्याचे समोर आले होते. केळद येथील शाळा सव्वा अकरापर्यंत बंद होती, तर निगडे येथील शिक्षक केळद कडून जाताना सव्वाअकरा वाजता दिसले. तसेच भोर्डी शाळेत विद्यार्थीच शाळा चालवत होते. हारपुड शाळेतील शिक्षक रजेबाबत प्रश्नचिन्ह होते. कोलंबी शाळेत दुपारी अडीच वाचता विद्यार्थींच शाळा चालवत होते.मागील दोन वर्षांपासून वेल्हे शिक्षण विभागाला शिक्षणाधिकारी नसल्याने तालुक्यातील शिक्षकांवर अंकुश राहिला नाही. लोकमत वृत्ताची गंभीर दखल घेत प्रशासनाकडून संबंधितांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत.या नोटीशीमध्ये बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणांचा हक्क अधिनियम २००९ मधील नियम क्र २४(१)(अ) तसेच महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीचा हक्क नियम २०११ मधील नियम क्रं १९ चा भंग करणारी असल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ भाग तीन मधील नियम क्रं ४ शिक्षांचे स्वरूपनुसार शिक्षकाविरुद्ध कारवाई का करू नये? याचा खुलासा करावा अशा स्वरूपाची नोटीस आहे. आखिल भारतीय ग्राहक पंचायत वेल्हे तालुक्याचे अध्यक्ष दिलीप फडके यांनीदेखील संबंधित शिक्षकांवर कारवाई करा, अशी मागणी लेखी निवेदन देऊन केली होती.
अखेर ‘त्या’ शिक्षकांना कारणे दाखवा नोटिसा
By admin | Published: April 03, 2017 1:39 AM