मुंबई : राज्य मंडळाच्या ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा २० अंतर्गत गुण दिले जाण्याचा निर्णय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी जाहीर केला आहे. यामुळे आता शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून ९ वी व १० वीच्या भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांकरिता लेखी परीक्षेद्वारे लेखी मूल्यमापन ८० गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन २० गुणांचे असेल. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्य मंडळाच्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून शिक्षकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून ९ वी ते १२ वीच्या पर्यावरणाच्या अभ्यासक्रमात जलसुरक्षा हा विषय श्रेणी विषयांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. जलसुरक्षेचे महत्त्व लक्षात घेता तसेच सध्या देशपातळीवर याबाबत करण्यात येत असलेली जनजागृती पाहता तो अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या वर्षापासून इयत्ता दहावीत भाषा आणि समाजशास्त्र विषयाला मिळणारे अंतर्गत गुण बंद केल्याने यंदा दहावीचा निकाल मोठ्या प्रमाणात घटला. यामुळे चांगले गुण मिळालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनाही राज्यातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश मिळण्यासाठी स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेत शालेय शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता नववी ते बारावीच्या विषयरचना तसेच मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी २५ सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी विचारात घेऊन ९ वी व १० करिता विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना तयार करण्यात आली आहे.अंतर्गत गुणांसाठी श्रवण, भाषण कौशल्यांचा समावेशलेखी मूल्यमापनासोबत विद्यार्थ्यांमधील विविध क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या सातत्यपूर्ण मूल्यमापनासाठी अभ्यासक्रमात अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट केल्याचे समितीने स्पष्ट केले. इयत्ता ९ वी व १० करिता भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी लेखी परीक्षेद्वारे ८० गुणांचे मूल्यमापन व अंतर्गत मूल्यमापन २० गुणांचे असेल. १० वीची अंतिम परीक्षा (राज्य मंडळामार्फत घेण्यात येणारी) ही केवळ १० वीच्या अभ्यासक्रमावरच आधारित असेल.तसेच भाषा विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनामध्ये सीबीएसईप्रमाणे श्रवण व भाषण कौशल्याचा समावेश करण्यात आला असून या प्रत्येक कौशल्याला प्रत्येकी ५ गुण देण्यात येतील. तर स्वाध्यायसाठी प्रत्येकी ५ गुणांचे २ स्वाध्याय असतील. अन्य विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनात गृहपाठ, बहुपर्यायी प्रश्न व उपक्रम यांची तरतूद करण्यात आली आहे. ३०० गुणांच्या ३ भाषा विषयांचा गट उत्तीर्णतेसाठी एकत्रित करण्यात आला असून यात किमान १०५ गुण आवश्यक असतील. त्यापैकी १०० गुणांच्या भाषा विषयांत किमान २५ व दोन्ही संयुक्त भाषा विषयांत २५ गुण आवश्यक असतील.मूल्यमापन वर्षभरात कधीही करता येणारयंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावी आणि १२ वीसाठी अंतर्गत मूल्यमापन हे ६५० ऐवजी ६०० गुणांचे असेल. सुधारित मूल्यमापन योजनेअंतर्गत मूल्यमापन शैक्षणिक वर्षाच्या शेवटी न करता पूर्ण वर्षभरात करण्याची मुभा असेल. यासंदर्भातील नियोजन कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक शाळा स्तरावर करता येऊ शकेल. तसेच ११ वीची वार्षिक परीक्षा ११ वीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर व १२ वीची वार्षिक परीक्षा १२ वीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल.अकरावी, बारावीच्या वार्षिक परीक्षेसाठी सीबीएसई मंडळाच्या धर्तीवर लेखी परीक्षेत किमान २५ टक्के बहुपर्यायी अथवा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असेल. यात विद्यार्थ्यांना किमान ३५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक असेल.
अखेर राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत २० गुणांचा दिलासा; आशिष शेलार यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 3:45 AM