पुणे : कोरोनामुळे लांबणीवर पडलेली इयत्ता दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा अखेर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. तसेच या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आज (दि. १९)पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.मार्च महिन्यातील परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाते. मात्र यावर्षी कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. परिणामी मार्चमधील परीक्षांचा निकालही लांबणीवर पडला. जुलै महिन्यात निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षांचे वेध लागले होते. पण कोरोनाचे संकट कायम असल्याने या परीक्षांबाबतही अनिश्चितता होती. परीक्षा न झाल्यास अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती होती. पण अखेर राज्य मंडळाने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच क्षेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरून आज पासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतील. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत दि. २९ ऑक्टोबरपर्यंत आहे. तर दि. ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. ही प्रक्रिया ऑनलाईन असल्याने विद्यार्थ्यांना शाळा किंवा महाविद्यालयामार्फत अर्ज भरावे लागतील. उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना दि. ३ व ४ नोव्हेंबरला बँकेत शुल्क भरावे लागेल. तर दि. ५ नोव्हेंबर रोजी शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळाकडे जमा कराव्या लागणार आहेत.------------ऑनलाईन अर्जासाठी संकेतस्थळ :-------------ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखा :नियमित शुल्कासह : दि. २० ते २९ ऑक्टोबरविलंब शुल्कासह : दि. ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर
अखेर दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा होणार; नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 8:17 PM
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना उद्या(दि. १९)पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार
ठळक मुद्देशुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळाकडे जमा कराव्या लागणार