एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागणाऱ्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना सरकार स्थापनेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उद्धव ठाकरेंना शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले होते. परंतू ते एकनाथ शिंदेंच्या शपथविधीला गेले नव्हते. मविआ सरकारचा शपथविधी होता, तेव्हा दुसऱ्यावेळी मुख्यमंत्री पद गमावलेले फडणवीस खुल्या दिलाने ठाकरेंच्या या सोहळ्याला आले होते. खरे म्हणजे आधीच्या मुख्यमंत्र्याने शपथविधीला येऊन कटुता संपविण्याची, नव्या सरकारला शुभेच्छा देण्याचा प्रघात आहे. फडणवीसांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. परंतू उद्धव ठाकरे शिंदेच्या शपथ सोहळ्याला आले नव्हते.
ज्या उद्धव ठाकरेंच्या संयमी, विनयशील नेतृत्वाची कालपासून चर्चा आहे, ते पाहता उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित रहायला हवे होते. परंतू उद्धव ठाकरेंनी ट्विट करून शिंदे आणि फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. "महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!'', असे ठाकरे म्हणाले.