उल्हासनगर : दृष्टीहीन असूनही यूपीएससीत उज्ज्वल यश मिळवलेल्या प्रांजल पाटील यांना नोकरी देण्यास अखेर रेल्वे प्रशासन तयार झाले आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कानउघाडणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पवित्रा बदलला असून त्यांना सेवेत सामावून घेण्याची तयारी दाखवली आहे.दूरसंचार खात्याने त्यांना नोकरी देण्याची तयारी दाखवली होती. मात्र प्रांजल यांना रेल्वेतच नोकरी करण्याची इच्छा असल्याने त्यांची ती इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आधी नोकरीचे आश्वासन देऊन नंतर टाळाटाळ करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या प्रवृत्तीविरोधात प्रांजल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना टिट्ट केले होते. त्याबाबत गेले दोन दिवस सोशल मीडियावर उलटसुलट टीका सुरू होती. त्याची दखल घेऊन प्रभू यांनी प्रांजल यांना नोकरीचे आश्वासन देत या वादावर पडदा टाकला.त्यांच्या आश्वासनानंतर आता रेल्वे प्रशासन कधी लेखी आदेश देते याची त्या वाट पाहात आहेत.उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरातील यशवंत शाळेजवळील चाळवजा घरात राहणाऱ्या प्रांजल यांनी अंधत्वावर मात करत दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. त्यानंतर तेथेच पीएचडीचे शिक्षण सुरू ठेवले. दृष्टीहीन असलेल्या प्रांजल यांच्या यशानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव जसा झाला, तसेच रेल्वेने लेखा विभागात नोकरीचे नियुक्तीपत्र पाठविले. मात्र त्यात पुढे काहीच हालचाल झाली नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी टाळाटाळ सुरू केल्याने अस्वस्थ होत त्यांनी ट्विट केले होते. (प्रतिनिधी)
अखेर रेल्वेला ‘दृष्टी’
By admin | Published: January 05, 2017 5:54 AM