औरंगाबाद, दि.६ - तरुण वयातच नोकरदार वर्गाने निवृत्तीनंतरचे नियोजन करायला हवे. भांडवल बाजार विकसित झाल्यानंतर मग निवृत्तीनंतरचे नियोजन करण्यासाठी नवनवीन साधने उपलब्ध होऊ लागली. सुरुवातीच्या काळात तर अशा प्रकारची कुठलीच साधने नव्हती. भविष्य निर्वाह निधी, बचत, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा एक निवृत्तीसाठी नियोजन करण्याचा चांगला विचार होता. सुरुवातीच्या काळात नियोजनाची आवश्यकता नव्हती. कारण एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती, ही पद्धती चांगली की वाईट, यावर अनेक वाद-विवाद होऊ शकतील; परंतु या पद्धतीत आपोआपच घरातले मिळवते आणि निवृत्त झालेले या दोघांनाही एकमेकांचा आधार घेता येत होता. यानंतरची एक पिढी अशी आली की, ज्या पिढीला आपल्या आई-वडिलांची जबाबदारी उचलावी लागली आणि निवृत्तीनंतर काय हे प्रश्न सोडवण्यासाठी गुंतवणूक सल्लागारांची मदत घ्यावी लागली आणि आता तर मुले परदेशात गेलेली. निवृत्त व्यक्तींना आराम करता यावा, अशी सोय नाही. कारण मुले परदेशात निघून गेली आणि त्यांनी आई-वडिलांच्या जबाबदारीचे ओझे खांद्यावरून फेकून दिले.गुंतवणुकीचे प्रॉडक्ट्स मात्र फारसे बदलले नाहीत. विमा कंपन्यांचे पेन्शन प्लॅन, बँकांच्या ठेवी, पोस्ट ऑफिस या पलीकडे जाऊन निवृत्तीसाठी नियोजन हा शब्द उशिरा रुळला. खासगी नोकर्यांमध्ये पेन्शनची सोय नाही म्हणून कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स गोळा करणे अशा प्रकारे शेअर्स सांभाळायचा ज्यांनी उद्योग केला ते यशस्वी झाले़ गुंतवणूकदारांच्या तुलनेने मिळालेले शेअर्स त्यानंतर हक्काच्या शेअर्सची विक्री अशा प्रकारे दीर्घकालीन गुंतवणूक करून निवृत्तीचे नियोजन करणारे गुंतवणूकदार मिळतात; परंतु भविष्यात अनिश्चितता असते, यामुळे शेअर्सकडे जाण्याऐवजी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून निवृत्तीचे नियोजन हा प्रकार गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचला. युटीआय रिटायरमेंट बेनिफिट पेन्शन आणि टेंपलटन म्युच्युअल फंडाची योजना उपलब्ध याच दोन योजनांच्या साहाय्याने निवृत्तीचे नियोजन करायला हवे असे नाही. तरुण वयात जोखीम स्वीकारण्याची ताकद दाखवली तरीसुद्धा इक्विटी योजनांच्या माध्यमातून गुंतवणुकीचे नियोजन चांगले होऊ शकते.
निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन
By admin | Published: May 06, 2014 4:26 PM