मुरुड / नांदगाव : गेल्या अनेक दिवसांपासून मुरुड तालुक्यातील बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने अनेक ग्रामस्थांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात डॉक्टर नसल्याने रु ग्ण त्रस्त झाले असून त्वरित डॉक्टर मिळावा, अशी मागणी करीत आहेत. सामाजिक कार्यकर्ते व भाजपा कार्यकर्ते सुरेश म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता व आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन देऊन डॉक्टर त्वरित उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे असून येथील एक वैद्यकीय अधिकारी दीड वर्षाच्या प्रशिक्षणासाठी बाहेर गेले आहेत, तर दुसऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा पांडे यांचा बॉण्ड संपल्याने हेही पद रिक्त झाल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून रु ग्णांचे हाल होत आहेत. येथे सध्या डॉक्टर मंगेश पाटील यांना तात्पुरते नियुक्त करण्यात आले आहे. बोर्ली आरोग्य केंद्राच्या हद्दीत ३० गावे व १५ हजार लोकसंख्या येथील आरोग्य केंद्रावर अवलंबून आहे. त्यासाठी येथे कायमस्वरूपी डॉक्टर असावा जेणेकरून रु ग्णांचे हाल होणार नाहीत, अशी मागणी सुरेश म्हात्रे यांनी केली आहे. डॉ. मंगेश पाटील यांच्याकडे नांदगाव प्राथमिक आरोग्य पथकाचा अधिभार असून त्यांना येथे वेळेत पोहचणे ही तर तारेवरची कसरत असून त्यामुळे येथील रु ग्णांना वाट पहावी लागत आहे. यासाठीच बोर्ली येथे कायम डॉक्टर मिळावा, अशी मागणी सुरेश म्हात्रे यांनी निवेदनात केली आहे. (वार्ताहर)
बोर्लीच्या आरोग्य केंद्रात डॉक्टर मिळावा
By admin | Published: June 13, 2016 3:10 AM