पुणे : ‘‘नवीन तंत्रज्ञान, पिकांच्या नव्या जातींमुळे उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या उत्पादनाला देशी बाजारपेठ पुरी पडणार नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी मिळेल याचा विचार केला पाहीजे. उत्पन्न वाढवायचे असेल तर शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांच्या बरोबर फळे आणि फुलांच्या शेतीकडे वळावे,’’ असा सल्ला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शनिवारी येथे दिला. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक त्रिलोचन मोहपात्रा, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक ए. के. सिंग, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु के. पी. विश्वनाथा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु एस. डी. सावंत, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष शिवाजी पवार, कैलास भोसले, अरविंद कांचन आदी या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, नवीन तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होताना दिसते. मात्र, बाजारपेठेअभावी भाव मिळत नसल्याने निराशा येते. युरोपात निर्यात होणाऱ्या एकूण द्राक्षापैकी ९८ टक्के द्राक्ष महाराष्ट्रातून जातात. चीन आणि दक्षिण आशियाई देशांची बाजारपेठ देखील निर्माण केली पाहीजे. द्राक्ष संघाने हंगामाच्या सुरुवातीला निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय मेळावा घेतला पाहीजे. निर्यातीसाठी केंद्रीय स्तरावर काही अडचण असल्यास त्यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन.
‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु असून प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे त्यासाठी निवडण्यात आली आहेत. या पुढे एकात्मिक कृषी आराखडा आखावा लागेल. आंतरपीक अथवा मत्स्य शेतीसारखे प्रयोग करावे लागतील. तरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते,’’ असे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक मोहपात्रा म्हणाले. कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु सावंत म्हणाले, की केवळ एकच पीक घेऊन चालणार नाही. द्राक्ष बागेसाठी तयार करण्यात येणाऱ्या शेततळ्यात मत्स्य उत्पादन घेते पाहीजे. एका वर्षांत शेततळ्याचा खर्च वसूल होईल. तसेच, तळ्यातील पाणी सिंचनासाठी वापरल्यास रोपांची रोगप्रतिकारक क्षमता वाढत असल्याचे प्राथमिक प्रयोगातून समोर आले आहे.