मुंबई : गणित विषय म्हटला की, अनेकांना त्यांच्या काठिण्य पातळीमुळे भीती वाटते. परंतु ज्या पद्धतीने विज्ञान विषय सोपा करून सांगण्यासाठी सोप्या पद्धतीचा अवलंब वैज्ञानिकांनी केला आहे. अगदी त्याच पद्धतीने गणित विषय सोपा करून सांगण्यासाठी गणितातील गमतीजमती शोधून काढायला हव्यात; तरच हा विषय विद्यार्थ्यांपर्यंत अधिक सोप्या पद्धतीने पोहोचेल, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांनी दादर येथील कार्यक्रमात मांडले.साहित्य अकादमीतर्फे ‘लेखक भेट’ या कार्यक्रमाचे आयोजन दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात करण्यात आले होेते. या वेळी नारळीकर बोलत होेते. साहित्याशी जुळलेल्या नात्याविषयी ते म्हणाले की, खरंतर एका अपघातामुळेच माझे पुस्तकाशी नाते जुळले. शिवाय आई ज्या गोष्टी सांगायची त्यातून साहित्याची गोडी निर्माण झाली; आणि विज्ञानाची आवड असल्यामुळे वैज्ञानिक साहित्याकडे वळलो. विज्ञान साहित्याविषयी ते म्हणाले की, विज्ञान साहित्याला अधिक झळाळी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्य संमेलन आणि साहित्यविषयक होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमांमधून ‘विज्ञान’ विषयावर चर्चा व्हायला हवी. तरच विज्ञान विषयातील साहित्यनिर्मितीला अधिक चालना मिळेल. विज्ञान विषयातील अनेक प्रश्नांवर या वेळी चर्चा करण्यात आली. ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वीतलावरील पाण्याचा साठा, बदलते हवामान याविषयीच्या शंका नारळीकरांनी दूर केल्या. याप्रसंगी साहित्य अकादमीचे कृष्णा किंभवने, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गणित सोपे करण्यासाठी नव्या गमतीजमती शोधून काढा
By admin | Published: January 23, 2017 4:40 AM