नाशिक : प्रभू रामचंद्रांच्या वनवासासाठी नाशिकमध्ये वास्तव्यास असताना अज्ञातवासात राहण्यासाठी त्यांनी जो गोपनीय भुयारी मार्ग वापरला होता, त्याचा शोध घेण्यासाठी आता थेट पंतप्रधान कार्यालयाने पुरातत्त्व खात्याला शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. पंचवटीतील सीतागुंफा ते रामशेज किल्ल्या दरम्यानच्या या भूमिगत मार्गाचे उत्खननातून रामकालीन इतिहासाला उजाळा मिळू शकेल, इतकेच नव्हे तर अनेक नवीन प्रकारची माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिक हे रामभूमी परिचित आहे. प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्य कालावधीच्या अनेक पाऊलखुणा आजही कायम आहेत. सीतागुंफा हे त्यातील एक. नाशिकमध्ये येणारे पर्यटक सीतागुंफा पाहण्यासाठी आवर्जून जातात. श्री काळाराम मंदिराच्याच जवळ असलेल्या या सीतागुंफामधूनच हे भुयार असल्याची नोंद आहे. नाशिकमधील गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचेदेवांग जानी यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटिशांच्या कालावधीत म्हणजेच बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटरमध्ये नाशिकच्या भुयारी मार्गासंदर्भात उल्लेख आहे. नाशिक त्र्यंबक गॅझेटियर १९४२ मध्ये प्रसिद्ध झाले असून, त्यात याचा संदर्भ आहे. सीतागुंफा म्हणजे सीतेचे वास्तव्याचे स्थान. गुंफेच्या पाठीमागील बाजूस शिवलिंग असून, तेथून ते सात मैल लांब मखमलाबादच्या पुढे असलेल्या रामशेज किल्ल्यापर्यंत हे भुयार होते. प्रभू रामचंद्र या भुयारी मार्गानेच रामशेज नावाने परिचित असलेल्या जागी शयनासाठी जात असत. त्यामुळेच येथे असलेल्या किल्ल्याला रामशेज नाव आहे. प्रभू रामचंद्र अज्ञातवासात असताना नाशिकच्या दंडकारण्यात भ्रमंती करताना सीतेला सुरक्षित ठिकाणी म्हणजेच गुंफेत ठेवत, त्यालाच सीतागुंफा नाव पडलेले आहे. सध्या गुंफेतील शिवलिंगाजवळील मार्ग बंद असून, त्यामुळे इतिहासाचे एक पान बंद आहे, असे त्यांनी सांगितले. भुयारी मार्ग शोधल्याने रामकालीन पौराणिक इतिहास खुला होऊ शकेल. त्यामुळे या भुयारी मार्गाचा शोध घ्यावा यासाठी जानी यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविले होते. त्याची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाने हे पत्र पुरातत्त्व खात्याला पाठविले आहे. त्याची प्रतही जानी यांना पाठविण्यात आली आहे.
नाशकातील रामकालीन भुयारी रस्ता शोधा; पंतप्रधानांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 4:54 PM