यदु जोशी/टीम लोकमत / मुंबईनगरपालिका आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विविध पक्षांच्या नेत्यांचे स्वकीय भाग्य अजमावित असून त्या निमित्ताने या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात आजीमाजी मंत्री, आमदारांचा समावेश आहे. काही आमदार वा वजनदार नेत्यांनी सावध भूमिका घेत त्यांच्या नातेवाइकांना उमेदवारी देण्याचे टाळलेले दिसते. समजा नातेवाइकाचा पराभव झाला तर उद्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपल्याला त्याचा फटका बसेल, या भीतीने अनेकांनी नातेवाइकांना दूर ठेवले आहे. त्याऐवजी त्यांचा स्वत:च्या निवडणुकीचे गणित समोर ठेऊन नगराध्यक्षपदाचा उमदेवार देण्यावर भर दिसतो. काहींना इच्छा असूनही आरक्षणामुळे नातेवाइकांना संधी देता आलेली नाही. असे असले तरी आपल्या नातेवाईकांना जिंकवण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते सध्या प्रचंड आटापिटा करीत आहेत. दर्यापूर मतदारसंघाचे (जि.अमरावती) शिवसेनेकडून दीर्घकाळ विधानसभेत प्रतिनिधीत्व केलेले आणि आता अकोला जिल्ह्यातील अकोटचे भाजपा आमदार असलेले प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी या दर्यापूरच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजपाकडून लढत आहेत. विशेष म्हणजे भारसाकळे यांचे चुलत बंधू आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकर भारसाकळे हे वहिनींच्या विरोधात काँग्रेसकडून उभे ठाकले आहेत. भाजपाचे माजी आमदार अरुण अडसड यांचे पुत्र प्रताप हे धामणगाव (जि.अमरावती) येथे नगराध्यक्षपदासाठी भाग्य अजमावित आहेत. त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या कनोजिया परिवाराने त्यांना पुन्हा आव्हान दिले आहे. तर पुसदच्या नाईक घराण्याची गादी सांभाळत असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते मनोहर नाईक यांच्या पत्नी अनिताताई या पुसदच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे लढताहेत. जालना शहरात काँग्रेसचे माजी आमदार कैलाश गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता अध्यक्षपदाच्या उमदेवार आहेत. याच जिल्ह्यात अंबडचे आमदार नारायण कुचे यांची भावजय संगीता देविदास कुचे भाजपाच्या उमेदवार आहेत. शिरपूरमध्ये माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या पत्नी जयश्रीबेन पटेल या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. दोंडाईचामधील लढत राजकीय घराण्यांतील झाली आहे. तिथे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुवर रावल या भाजपाच्या उमेदवार असून त्यांना माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख यांचे बंधू रवींद्र यांनी आव्हान दिले आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या वहिनी बिल्किस मुश्रीफ या बंडाचा झेंडा फडकवत कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये नगराध्यक्षपदासाठी अपक्ष लढताहेत. गडहिंग्लजमध्ये माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या स्वाती कोरी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत.
स्वकीयांसाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: November 15, 2016 6:42 AM