ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - बलात्कार करुन जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप करणा-या त्या 16 वर्षीय नेपाळी मुलीचा आणि दिल्लीमधील 24 वर्षीय मॉडेलचा लवकराच लवकर शोध घ्या असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना दिला आहे. नेपाळी तरुणीने आपल्यावर 100 हून अधिक जणांनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. यामध्ये काही पोलिसांचाही समावेश होता. या दोन्ही पीडित तरुणी गेल्या सहा महिन्यांपासून बेपत्ता असून दिल्लीमधील वकिल अनुजा कुमार यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली असून प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
'करण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर असून आम्हाला पीडित मुलींच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे. त्या कुठे आहेत यासाठी गांभीर्याने प्रयत्न करुन त्यांचा लवकरात लवकर शोध घ्या', असा आदेश न्यायाधीश रणजीत मोरे आणि रेवती डेरे यांच्या खंडपीठाने दिला आहे. वकिल अनुजा कुमार यांनी पीडित तरुणींच्या जिवाला धोका असून, यामध्ये पोलीस आणि प्रभावी लोकांचा समावेश असल्याने त्यांचं बरं वाईट झालं असल्याची भीती व्यक्त केली आहे.
यावेळी न्यायालयाने तक्रारीत नोंद असलेल्या दोन पोलीस अधिकारी न्यायालयात वकिलाला सल्ला देण्यासाठी उपस्थित असल्याचं पाहून संताप व्यक्त करत चांगलंच खडसावलं. चौकशी अधिकारी मात्र न्यायालयात अनुपस्थित होता. 'जबाबात या पोलीस अधिका-यांची नाव असताना वकिलाला सल्ला देण्याशी त्यांचं काही देणं घेणं नसल्याचं', न्यायालयाने सुनावलं. 31 मार्च रोजी होणा-या पुढील सुनावणीला डीसीपी रँकच्या अधिका-याला पाठवण्याचा आदेश न्यायालयाने पुणे पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण -
16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 113 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पिडीत मुलीने केलेल्या तक्रारीत बलात्कार करणा-यांमध्ये पोलिसांचादेखील समावेश असल्याची माहिती दिली होती. पिडीत मुलीने आपली स्वत: सुटका करुन घेतली आणि दिल्लीला पळून गेली होती. दिल्लीमध्ये पोलीस तक्रार केल्यानंतर ही धक्कादायक माहिती उघड झाली होती. दिल्ली पोलिसांनी ही केस पुणे पोलिसांकडे हस्तांतरित केली आणि 113 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणीला अटकदेखील केली होती.
पिडीत मुलगी पश्चिम बंगालची राहणारी आहे. नोकरीचं अमिष दाखवून तिला पुण्यात आणण्यात आलं होतं. मात्र पुण्यात आणल्यानंतर तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं होतं. महत्वाचं म्हणजे हे प्रकरण दिल्लीमधील मॉडेल रेपप्रकरणाशी संबंधित होतं. पिडीत मुलीने जेव्हा पलायन केलं तेव्हा तिच्यासोबत ही मॉडेलदेखील होती. चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी अजून 4 आरोपींना अटक केली होती.
विमानतळ पोलिसांनी अटक केलेल्या तरुणीचं नाव स्विक्रिती खरेल असून ती नेपाळची नागरिक आहे. चंदननगर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे रोहीत भंडारी, हरिश शाहा, तपेंद्र साही आणि रमेश ठकुला असं असून सर्वजण नेपाळचे नागरिक आहेत. हे सर्व आरोपी पुण्यातील चंदन नगरमध्ये राहायचे. तक्रारीत देण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये शक्ती, अण्णा, भारत यांचादेखील समावेश आहे. हे सेक्स रॅकेट चालवण्यात या सर्वांचा सहभाग होता.
'पिडीत मुलगी नेपाळ - भारतच्या सीमारेषेवरील सिलिगुरीची रहिवासी आहे. तिचे वडील आईला सोडून गेले होते तेव्हापासून तिच्या आईची मानसिक स्थिती ढासळली आहे. तिची आजी चहाची टपरी चालवते. त्याठिकाणी आरोपी भंडारी सिगरेट खरेदी करण्यासाठी यायचा. तेव्हाच त्याने पिडीत मुलीला पाहिलं होतं. त्याने ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देतो सांगून तिला जानेवारी 2014मध्ये पुण्यात आणलं होतं. सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले पण नंतर तिला वेश्याव्यवसाय करण्याची जबरदस्ती केली. आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि इतरांसोबत करण्यास भागही पाडलं. आरोपीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं ज्यामध्ये संजय पार्क, विमान नगर, खर्डी यांचा समावेश होता.आरोपी स्वीकृती मला हैदराबाद, अहमदाबाद आणि भोपाळला घेऊन गेली होती असा जबाब पिडीत मुलीने दिला आहे', अशी माहिती पोलिसांनी दिली होती.
त्यानंतर पिडीत मुलीला पुण्यात आणून खर्डीमधील फ्लॅटमध्ये ठेवण्यात आलं. याठिकाणी तिला लैंगिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडण्यात आलं. तिला मारहाणदेखील करण्यात आली. गरोदर राहिली असताना तिचा गर्भपातही करण्यात आला. तिच्यासोबत दिल्लीतील मॉडेलदेखील होती. तिलादेखील लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पडण्यात आलं होतं. सिगारेटचे चटकेदेखील देण्यात आले होते. गेल्या महिन्यात दोघी ब्युटी पार्लरमध्ये जाण्याचा बहाण्याने बाहेर पडल्या आणि दिल्लीला पलायन केलं.
मार्च महिन्यात जेव्हा मॉडेल उपचारासाठी दिल्लीतील रुग्णलायत भर्ती झाली होती तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना कळवल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी केस पुणे पोलिसांकडे हस्तांतरित केली होती त्यानंतर चंदन नगर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती.