लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळा आणि सध्याचा जलयुक्त शिवारमधील घोटाळ्यात बरेच साम्य असून सरकारमध्ये जल दरोडेखोर कोण आहेत, ते शोधून काढू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.शिवसंपर्क अभियानांतर्गत अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी तूर खरेदीवरून शासनाच्या भूमिकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, तूर लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले; पण तूर खरेदीचे शासनाने कोणतेच नियोजन केले नाही. नाफेडद्वारा राज्यात तूर खरेदी सुरू होती; मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता ती बंद करण्यात आली. मला शेतीतले काही कळत नाही,असे बोलले जाते. पण मी कृषीतज्ज्ञ नसलो, तरी शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण शिवसेनेला असल्यामुळेच आम्ही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सत्तेत सहभागी असलो, तरी शेतकऱ्यांच्या व्यथा, अपेक्षा व्यक्त करतोय, याचा अर्थ भाजपला विरोध करतो, असा होत नसल्याची पुष्टीही ठाकरे यांनी यावेळी जोडली. भाजपाच्या संवाद यात्रेत संवाद कमी, शिवीगाळच होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
सरकारमधील दरोडेखोर शोधून काढू - उद्धव ठाकरे
By admin | Published: May 16, 2017 1:22 AM