ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 7 - कीर्ती आॅइल मिलच्या वेस्टेज सेटलमेंट टँकमध्ये स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या ९ कामगारांचा गुदमरून मृत्यू झालेल्या प्रकरणाची कामगार संचालनालयाने गंभीर दखल घेतली असून, जोपर्यंत या मिलमध्ये सुरक्षेसंदर्भात उपाययोजना केली जात नाही, तोपर्यंत मिलला सिल ठोकण्यात यावे, असे आदेश कामगार संचालनालयाचे संचालक जयंत मोडदरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.१२ नंबर पाटीनजीकच्या नवीन एमआयडीसी परिसरात कीर्ती आॅइल मिलमध्ये वेस्टेज सेटलमेंट टँकची स्वच्छता करताना ९ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना ३० जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी वेगवेगळ्या विभागांकडून ८ दिवसांत कीर्ती आॅइल मिलची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे. राज्याच्या कामगार संचालनालयाच्या कारखाना विभागाच्या वतीनेही आॅइल मिलचा पंचनामा आणि पाहणी करण्यात आली आहे. या पाहणीसाठी कामगार संचालनालयाच्या कारखाना विभागाचे राज्य संचालक जयंत मोडदरे हे लातुरात आले होते. त्यांच्या पथकाने केलेल्या पाहणीत कारखाना व्यवस्थापनाने सुरक्षेबाबत अक्षम्य निष्काळजी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची संचालक मोडदरे यांनी गंभीर दखल घेतली असून, सुरक्षेच्या संदर्भात जोपर्यंत कारखाना व्यवस्थापनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत, तोपर्यंत कारखाना सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. याबाबतचे पत्रही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाठविले आहेत, अशी माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग नांदेडचे सहाय्यक संचालक महेश भालेकर यांनी दिली.
प्रदूषण मंडळाकडूनही होणार कारवाईकीर्ती मिलमधील ९ कामगारांच्या मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या लातूर उपप्रादेशिक विभागाने तातडीने दुसऱ्या दिवशी पाहणी करून यासंदर्भातील अहवाल औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाकडे पाठविला आहे. शिवाय, औरंगाबाद प्रादेशिक अधिकारी जेबी़ संगेवार यांनी मिलला भेट दिली आहे. या प्रकरणी येत्या दोन दिवसांत मील व्यवस्थापनावर कारवाई होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी व्ही. पी. शेळके यांनी दिली.मिल व्यवस्थापनावर पाच खटलेकीर्ती आॅईलमधील वेस्टेज सेटलमेंट टँकची करताना ९ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी कामगार आयुक्तालयाच्या वतीने मील व्यवस्थापनाविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे पाच खटले न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. या पाच खटल्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यातील कामगार कायद्यानुसार काही खटले दाखल करण्यात आले आहेत. तर कामगारांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी कामगार न्यायालयातही खटले चालविण्यात येणार आहेत, अशी माहिती कामगार आयुक्त बी. पी. पाटील यांनी दिली.