मुंबई : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांच्या साथीने हजेरी लावलेल्या पावसाने अजूनही मुंबईत ठाण मांडलेले आहे. सध्या तर पावसाचा मुंबईत चांगलाच धुमाकूळ सुरू आहे. यंदा मुंबईत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे काही मुंबईकर त्रासले होते. मात्र अनेक ठिकाणी पावसाचा आनंदही मुंबईकरांनी घेतला. उपनगरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उपनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आॅफिसला जाताना आणि घरी परतताना मुंबईकरांचे हाल झाले. जोरदार पावसामुळे रेल्वे विलंबाने धावत होत्या. खड्डे आणि पाणी साठल्यामुळे रस्त्यांवरही वाहतूककोंडी झाली होती. दुसरीकडे पूर्व उपनगरांमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या प्रमुख उपनगरांमध्ये अनेक भाग जलमय झाले होते. प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने पायी चालणाऱ्या तसेच वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात त्रेधातिरपीट उडाली. दुपारनंतर सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शहर परिसरातही वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली होती. माझगाव परिसरात नेसबीट रोडवर दुपारी पाणी साचल्यामुळे वाहतूककोंडी झाली. दुपारी तीनच्या सुमारास बुरहानी महाविद्यालयाबाहेर रस्त्यावर पाणी तुंबल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. तसेच डॉकयार्ड रेल्वे स्थानकानजीक दिलिमा स्ट्रीटजवळही पावसामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीची कोंडी होऊन बराच काळ खोळंबा झाला होता. (प्रतिनिधी)>खड्ड्यांमुळे पावसाचा त्रास अधिक पश्चिम उपनगरात गेल्या सहा दिवसांत पावसाने उसंत घेतलेली नाही. त्यामुळे खड्डेमय रस्त्यांचा त्रास अधिकच वाढला असल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. दिंडोशीतील रस्ते खड्डेमय झाले आहेत. ओबेरॉय जंक्शन येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीतील खड्डे आणि महापालिकेच्या हद्दीतील ओबेरॉय मॉल ते रत्नागिरी हॉटेल जंक्शन येथील खड्डे यांना पार करताना नागरिकांची त्रेधातिरपीट झाली होती. बेस्टच्या बस आणि येथील आयटी पार्क ते रेल्वे स्थानक या मार्गावरील रिक्षांनादेखील वाहतूककोंडीचा मोठा फटका बसला. सोमवारी रात्री गोरेगाव रेल्वे स्थानक येथील शेअर रिक्षाची रांग चक्क गोरेगाव (पूर्व) येथील रेल्वे स्थानकातील तिकीटघरापर्यंत गेली होती. परिणामी गोरेगाव रेल्वे स्थानक ते नागरी निवारा येथील प्रवासाला चक्क एक ते सव्वा तास लागत असल्यामुळे येथील नागरिकांनी आणि विशेषत: नोकरदार महिलांनी संताप व्यक्त केला.>वाहनांचा प्रवास लांबलामुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूकसेवांना चांगलाच फटका बसला. काही ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतूककोंडीचा सामना करतानाच वाहनांचा वेग मंदावल्याचे दिसून आले. वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून जाताना वाहनांना तासन्तास प्रवासासाठी मोजावे लागत होते. पावसामुळे बोरीवली ते वांद्रे प्रवास बराच लांबत होता. तर सायनकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक धिमी असल्याने वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. एलबीएसवरील गांधीनगर, ईस्टर्न एक्स्प्रेसवरील छेडानगर, अंधेरीतील चकाला, कलानगर जंक्शन, सीप्झ फ्लायओव्हर, खार ते आॅपेरा हाऊस, दादर स्टेशन ते एलफिन्स्टन स्टेशन, वरळी किल्ल्याजवळ वाहनांचा वेग मंदावला होता. ठिकठिकाणी वाहतूक पोलीस वाहतूककोंडी सोडवण्याचे प्रयत्न करताना दिसत होते. सकाळपासून सुरू असलेली वाहतूककोंडी संध्याकाळपर्यंत होती. हवामान योग्य नसल्याने अनेक विमाने उशिराने उड्डाण करत असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली. >द्रुतगती नव्हे कूर्मगती मार्गमुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीची बराच वेळ कोंडी झाली होती. तसेच एस.व्ही. रोड आणि एलबीएस मार्गावरही अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यात खड्ड्यांची भर पडलेली असल्याने वाहतूक धिमी झाली होती. कालिना परिसरातही वाहतूककोंडी दिसून आली. कुर्ला कमानी परिसरात बऱ्याच भागात पाणी साचले होते.
मुंबईत ‘फुल्ल आॅन’ पाऊस
By admin | Published: September 21, 2016 2:27 AM