लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड: भाईंदर पूर्वेस खाडी किनाऱ्यावरील कांदळवन क्षेत्रात कचरा टाकणाऱ्या हॉटेल मालकाकडून ५ हजार रुपयांचा दंड महापालिकेने वसूल केला आहे. भाईंदर पूर्वेला आर एन पी पार्क परिसरात ग्रीनचीली नावाचे हॉटेल आहे. सदर हॉटेल चालक कचरा हा रात्री लगतच्या कांदळवन क्षेत्रात तसेच रस्त्यावर, पदपथावर फेकल्याचे निदर्शनास आले.
सदरची तक्रार रविवारी रात्री मिळाल्याने महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त अजित मुठे यांच्या निर्देशानुसार तात्काळ संबंधित हॉटेलवर कारवाई करण्याचे आदेश सोमवारी सकाळी स्वच्छता निरीक्षक रमेश घरत व कांतीलाल बांगर यांना दिले. त्यानुसार संबंधित हॉटेलने दंड न भरल्याने हॉटेलमधील सिलेंडर, गॅस इत्यादी सामान जप्त करून कारवाई करण्यात आली असता हॉटेल मालकाने दंड भरण्याची तयारी दर्शवली. त्या नंतर हॉटेल मालकाने ५ हजार रुपयांचा दंड भरला.
घनकचरा अधिनियमानुसार सर्व हॉटेल चालक, शहरातील सोसायटी, व्यावसायिक, औद्योगिक वसाहत यांनी सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर कचरा न फेकण्याचे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यां विरुद्ध दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा उपायुक्त अजित मुठे यांनी दिला आहे.