लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अटी गुंडाळून सोयाबीनची तत्काळ प्रतिक्विंटल ३,0५0 रुपये आधारभूत किमतीने खरेदी करण्याचे आदेश कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे ‘नाफेड’च्या अधिकार्यांना दिले. सोयाबीनमधील आद्र्रता १२ ऐवजी १४ टक्के असली, तरी खरेदी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. खोत यांनी रविवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन खरेदी केंद्रास भेट देऊन आढावा घेतला. उत्पादनाच्या तुलनेत फारच कमी खरेदी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने ते संतापले होते. दोन ठिकाणी सोयाबीनची तपासणी होत असल्याने शेतकर्यांची कुचंबणा होत असल्याचे बाजार समिती पदाधिकार्यांनी निदर्शनास आणून दिले. खरेदी केंद्र व वेअर हाउसऐवजी केवळ खरेदीच्या ठिकाणी तपासणी करा. सात-बारावरील नोंद न पाहता, शेतकरी असल्याचा दाखला, आधार कार्ड व बँक पासबुकाची झेरॉक्स पाहून खरेदी करा, असे त्यांनी स्पष्ट केले.अटी गुंडाळून ठेवा, सोयाबीनमध्ये घाण असेल, तर त्याला चाळण द्या आणि खरेदी करा. पहिल्यांदा चांगल्या मालाची खरेदी होऊ दे, नंतर दुय्यम प्रतीचेही बघू, असेही त्यांनी सांगितले.
मी सांगतोय, तोच अध्यादेश!सगळ्य़ा अटी बाजूला ठेवून सोमवारपासून खरेदी करा. कोणत्याही परिस्थितीत खरेदी वाढली पाहिजे. हयगय करणार्या अधिकार्यांवर कारवाई केली जाईल. सुधारित अध्यादेशाची वाट पाहू नका; मी सांगतो तोच अध्यादेश, असे ते म्हणाले.
प्रत्येकी १0 लाख क्विंटल खरेदी : केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी १0 दहा लाख क्विंटल खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.