पालघर: मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आकर्षक योजनांचे आमिष दाखवून अकोल्यातील शेकडो नागरिकांकडून कोट्यवधी रु पयांची गुंतवणूक करून घेतली आणि मुदत पूर्ण होऊनही रक्कम परत केली नाही. दिलेले धनादेशही अनादरित झाले. फसवणूक झाल्यामुळे नागरिकांनी बुधवारी रात्री रामदासपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी रात्री ८.३० वाजता कंपनीचे संचालक वर्षा मधुसूदन सत्पाळकर (रा. विरार), जनार्दन अरविंद परूळेकर (रा. वसई) आणि शाखा व्यवस्थापक अशोक बैस (रा. शेगाव) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.शहरातील मलकापूर येथील सुरेखा नगरात राहणारे प्रशांत रामदास मानेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी काही वर्षांपूर्वी मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अकोला शाखा कार्यालयात चार विमे काढले होते. त्यासाठी त्यांनी कंपनीकडे १ लाख ८०० रुपये भरले होते. गुंतवणुकीच्या रकमेची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मैत्रेय कंपनी शाखा कार्यालयात संपर्क केला. कंपनीने त्यांना एक धनादेश दिला. हा धनादेश त्यांनी बँकेत वटविण्यासाठी नेला; परंतु धनादेश अनादरित झाला. त्यांनी कंपनीकडे याची तक्रार केल्यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यांनी कंपनीकडे रकमेची मागणी केली; परंतु कंपनीने त्यांना रक्कम परत केली नाही. मानेकर यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. मैत्रेय प्रा. लि. कंपनीत शहरातील ६०० नागरिकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. (वार्ताहर)
‘मैत्रेय’च्या संचालकांविरुद्ध अकोल्यात गुन्हा दाखल
By admin | Published: August 08, 2016 1:55 AM