महागड्या कारवर अंबर दिवा लावून फिरणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह आता त्यांच्या कुटुंबाचे एकेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. चोर म्हणून पकडलेल्या नातेवाईकाला सोडविण्यासाठी खेडकर यांनी थेट नवी मुंबईच्या बड्या पोलीस अधिकाऱ्याला आयएएस पदाचा धाक दाखविल्याचा प्रकारही घडला आहे. अशातच त्यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांचा शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवत दमदाटी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी मनोरमा यांच्यावर एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
पूजा खेडकर या राज्यात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून तैनात होत्या. आयएएस बनून अवघे काही महिने झालेले असतानाच खेडकरांचे एकेक प्रताप समोर येऊ लागले आहेत. मुळात आयएएस पदाची नोकरी ओबीसी क्रीमीलेअर सर्टिफिकीट ते करोडोंची मालमत्ता असूनही ईडब्ल्यूएस दाखवून, डोळ्यांनी दृष्टीहीन असल्याचे दाखवून बळकावल्याचा आरोप होत आहे. आता यामुळे युपीएससी अॅक्शनमध्ये आली असून त्यांची ही सर्टिफिकीट तपासली जाणार आहेत. काही काळेबेरे आढळल्यात खेडकर यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ केले जाणार आहे.
या खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे वाहतूक पोलिसांना व माध्यमांना दमदाटी केली होती. पोलीस खेडकर वापरत असलेल्या ऑडी कारवरील चलनांची नोटीस देण्यासाठी गेले होते. परंतू मनोरमा यांनी गेट उघडण्यास मज्जाव करत त्यांनाच दमदाटी केली. आता पोलीस अॅक्शनमध्ये आले आहेत.
मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर आणि इतरांविरोधात विरोधात कलम 323, 504, 506, 143, 144, 147, 148 आणि 149 तसेच शस्त्रास्त्र कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे. हे प्रकरण शेतकऱ्यांची जमीन हडपण्याशी संबंधीत आहे. २०२३ मधील मनोरमा यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या शेतकऱ्यांनी याविरोधात पौड पोलीस ठाण्यात तक्रारही देण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, वरून फोन आल्याने पोलिसांनी ही तक्रार नोंदविली नाही, असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. आता प्रकरण पेटत असल्याचे पाहून पुणे पोलिसांनी मनोरमा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कोण आहेत पूजा खेडकर...पूजा खेडकर यांनी अंशतः दृष्टिहीन आणि मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यातून त्यांना आयएएस परीक्षेत ८२१वी श्रेणी मिळून महाराष्ट्र केडर मिळाले होते. सुरुवातीला प्रशिक्षणासाठी त्यांना भंडारा जिल्हा देण्यात आला. मात्र, नाट्यमय घडामोडींनंतर पुणे देण्यात आला. रुजू होण्यापूर्वीच त्यांनी स्वतंत्र गाडी, बंगला, दालन तसेच कर्मचाऱ्यांची मागणी केली. दालनाची व्यवस्था न केल्याने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे दालन बळकावले. स्वत:च्या ऑडीवर लाल दिवा लावला