Farhan Azmi: औरंगजेबाच कौतुक करणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि शिवाजीनगर-मानखुर्दचे आमदार अबू असीम आझमी चांगलेच वादात सापडले आहेत. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता म्हणून अबू आझमी यांनी छत्रपती संभाजी महारांजाबाबत विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले. शिवसेना शिंदे गटाने गुन्हा दाखल केल्यानंतर अबू आझमी यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं. त्यानंतर आता अबू आझमी यांचा मुलगाही अडचणीत सापडला आहे. अबू आझमी यांचा मुलगा अबू फरहान आझमी याच्याविरोधातही एका प्रकरणात गुन्हा दाखल झालाय.
उत्तर गोवा पोलिसांनी अबू आझमी यांचा मुलगा अबू फरहान आझमी आणि इतर लोकांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी भांडण आणि शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मुघल शासक औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या विधानामुळे आमदार अबू आझमी यांना टीकेचा सामना करावा लागत असताना फरहान आझमींविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आझमी पिता पुत्र चांगलेच अडचणीच सापडले आहेत.
सोमवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास गोवा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कँडोलिम उत्तर गोव्यातील एका सुपरमार्केटजवळ भांडण झाल्याची माहिती मिळाली. भांडणादरम्यान अबू फरहान आझमीने स्थानिक मुलांना त्याच्याकडे कायदेशीर परवाना असलेली बंदूक असल्याचे सांगितले. वाद वाढल्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना कळंगुट पोलीस ठाण्यात आणलं. मात्र दोन्ही गटांनी तक्रार देण्यास नकार दिला. पोलिसांनी सर्वांना त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात म्हापसा येथे न्यायचे ठरवलं. पण ते गेले नाहीत.
त्यानंतर अबू फरहान आझमीने बंदुकीचा परवाना आणि गोव्यात शस्त्र बाळगण्याची परवानगी पोलिसांना दाखवली. कळंगुट पोलिसांनी मंगळवारी सकाळी सर्व आरोपींचे जबाब नोंदवले. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी भांडण, शांतता भंग आणि वाद निर्माण केल्याने पोलीस उपनिरीक्षक परेश सिनारी यांनी तक्रार दाखल केली आणि दोन्ही बाजूच्या लोकांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये अबू फरहान आझमी, झिऑन फर्नांडिस, जोसेफ फर्नांडिस, श्याम आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
फरहान आझमी मर्सिडीज एसयूव्हीमध्ये प्रवास करत होते. सुपरमार्केटजवळ त्याच्या गाडीने वळण घेतले तेव्हा त्यांच्या मागे असलेल्या एका गाडीतील दोन स्थानिक लोकांनी आझमीशी वाद घातला. लेन बदलत असताना इंडिकेटर न देता फरहानच्या गाडीने वळण घेतल्याचा दावा स्थानिकांनी केला. त्यानंतर वाद सुरू असताना त्या दोघांचे कुटुंबीय आणि स्थानिक लोक तिथे जमा झाले. त्यांनी आझमी आणि त्याच्या ड्रायव्हरला गाडीतून उतरण्यास सांगितले. यादरम्यान फरहान आझमीने त्याच्याकडे परवाना असलेली बंदूक असल्याचे सांगितले.