बेळगाव - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बेळगावात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
काश्मीर, कावेरी, सतलज आणि बेळगावचा विषय लोकशाही मार्गाने सुटला नाही तर आम्ही ठोकशाहीने प्रश्न सोडवू, अशी आक्रमक भाषा राऊत यांनी शुक्रवारी केली होती. बेळगावचा प्रश्न लोकशाहीच्या मार्गाने सुटत नसेल तर, आम्ही ठोकशाहीच्या मार्गाने हा प्रश्न सोडवू, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (29 मार्च) दिला होता. बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग आहे. दोन्ही भागांचा इतिहास आणि संस्कृती एकसारखीच आहे. न्यायालय सीमाभागाबाबत कधी निर्णय घेईल, तो घेवो. मात्र, तोपर्यंत बेळगाव हा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, असे राऊत यांनी म्हटले. याशिवाय, शिवसेना नेत्यांना बेळगावमध्ये मज्जाव करण्यावरूनही त्यांनी खडे बोल सुनावले. आम्ही बेळगावात जाण्याची परवानगी मागितली तर त्याकडे जणू काही पाकिस्तानात जायची परवानगी मागत आहोत, अशा दृष्टीने बघितले जाते. बेळगाव आणि अन्य सीमावर्ती भागातील लोकांवर जेव्हा अन्याय होईल तेव्हा त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटलेले पाहायला मिळतील. काश्मीर, कावेरी, सतलज आणि बेळगावचा विषय लोकशाही मार्गाने सुटला नाही तर आम्ही ठोकशाहीने प्रश्न सोडवू अशी आक्रमक भाषा राऊत यांनी केली.