ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - देवनार डंपिग ग्राऊंडवर आता पुन्हा आग लागली आहे. २४ तासनंतरही अजूनही आगीवर नियंत्रिण मिळवण्यात यश आले नाही. रविवारी रात्री डंपिंग ग्राऊंडवरील लागलेली आग सोमवारी सकाळीदेखील नियंत्रणात आली नव्हती. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि 10 वॉटर टँकर आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. रविवारी देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याने पेट घेतल्यानंतर आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलातर्फे घटनास्थळी आठ फायर इंजिन आणि आठ वॉटर टँकर्स पाठवण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात येत होते. आगीमुळे पुन्हा एकदा डंपिंग ग्राऊंड दुसरीकडे हलवण्याची मागणी स्थानिकांकडून होऊ लागली आहे.
मार्च महिन्यांत दुसऱ्यांदा देवनार डम्पिंगला आग लागली आहे. याबाबत महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवनार डम्पिंग ग्राउंडवर दोन दिवसांपासून लहान-लहान आगी लागत होत्या. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते, परंतु रविवारी या आगीने रौद्र स्वरूप धारण केले.