- गणेश आहेर लोणी ( जि. अहमदनगर): संपुर्ण राज्याची विज नियंत्रण करणाऱ्या बाभळेश्वर नजीक असलेल्या निर्मल पिंपरी येथील चारशे केव्ही सबस्टेशन मधील रिअॅक्टरला आग लागुन तो जळून ख़ाक झाला. बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुमारे दोन किलोमीटर अंतरावर धुराचे लोट पसरल्याने या परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सात अग्निशामक बंब आगीवर नियंत्रण मिळवविण्यासाठी अर्धा तासापासून प्रयत्नशील आहेत. मात्र, एकापाठोपाठ एक अशा स्फोटांमुळे मोठी भीती पसरली आहे.
सबस्टेशन मध्ये येणारा अतिदाबाचा करंट नियंत्रित करण्याचे काम रिअॅक्टर द्वारे करण्यात येते . येथील रिअॅक्टरला नेमकी आग कशामुळे लागली हे गुलदस्त्यात असले तरी अर्थींग व्यवस्थित न मिळाल्याने गरम होवून फुटला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
आगीत खाक झालेल्या या रिअॅक्टरमध्ये पन्नास हज़ार लिटर ऑईल साठवण्याची क्षमता असल्याने राज्य विज मंडळाचे मोठे नुक़सान झाले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आगीबाबत बाभळेश्वर येथील सबस्टेशन मधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही .आजच्या या आगीत रिअँक्टर जळून ख़ाक झाला असला तरी पर्यायी व्यवस्था असल्याने वीज वितरणावर फारसा परिणाम झाला नाही .