लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक पारखेड शिवारातील भारत संचार निगम लिमिटेडच्या गोदामाला आग लागली. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता दरम्यान लागलेल्या या आगीने क्षणार्धात उग्र स्वरूप धारण केले. त्यामुळे या आगीत लक्षावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
भारत संचार निगम लिमिटेडचे एमआयडीसीतील पारखेड शिवारात गोदाम आहे. या गोदामाचा वापर केबलसह इतर साहित्य ठेवण्यासाठी वापर करण्यात येतो. दरम्यान, शनिवारी सकाळी शार्ट सर्कीटमुळे गोदामाला आग लागली. मोठ्याप्रमाणात केबल आणि इतर साहित्य जळाल्याने एमआयडीसी परिसरात प्रचंड धुराचे लोट उठले. आगीची माहिती मिळताच नगर पालिकेचा अग्निशमन विभागासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे. दुपारी १० वाजेपर्यंत अग्निशमन विभागाने पाण्याचे दोन बंब रिचविले होते. तरीही ही आग आटोक्यात आली नव्हती.
शॉर्ट सर्कीट की घातपात..-मध्यंतरी भारत संचार निगम लिमिटेच्या गोदामातून मोठ्याप्रमाणात केबल गायब झाले. गायब झालेले केबल गेले तरी कुठे? हा प्रश्न अनुत्तरीत असतानाच शनिवारी गोदामाला आग लागली. त्यामुळे गोदामात शॉर्ट सर्कीट झाले की घातपाल असा प्रश्न आता आगीच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. गोदामातून गायब झालेल्या केबलचा साठा मॅनेज करण्यासाठी तर ही आग लावली गेली नाही ना? अशी चर्चाही दबक्या आवाजात शहरात होत आहे.