पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली आहे. मांजरी परिसरातील गोपाळपट्टा भागात असलेल्या या इमारतीला आग लागली आहे. मात्र, सुदैवाने कोरोनावरील कोव्हिशील्ड लस सुरुक्षित असल्याची माहिती मिळत आहे. ज्या इमारतीमध्ये कोव्हिशील्ड लस निर्मितीचे काम सुरु आहे, त्या ठिकाणी ही आग लागली नसल्याचे सांगण्यात येत आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीचे काम सुरु आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला ही आग लागली आहे. सुदैवाची बाब म्हणजे या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे आणि हानी टाळणे याला सद्यस्थितीत प्राधान्य असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याचा आणि मदत कार्यात झाल्या आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास सध्या प्राधान्य देण्यात येत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये दुपारी २ च्या सुमारास आग लागली. मांजरी भागात असलेल्या इमारतीत बीसीजी विभाग आहे. या भागात बीसीजीची लस तयार करण्याचे काम चालते. कोरोना लसीचे संशोधन आणि उत्पादनाचा विभाग या ठिकाणी नसल्याचे चिंतेची बाब नसल्याचे सीरम इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आले आहे. तसेच, आग लागलेल्या भागात चार कर्मचारी अडकले होते. त्यापैकी तिघांची सुटका करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. तसेच, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, वॉटर टँक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मोठी लस उत्पादक कंपनीजगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असा सिरम इन्स्टिट्यूटचा नावलौकिक आहे. काही दिवसांपूर्वीच सीरमने कोरोना प्रतिबंधक असलेली कोविशिल्ड लस देशभरात वितरणासाठी उपलब्ध करून दिली आहे. कोविशील्डच्या लसीकरणाची मोहीम देशात सुरू आहे. तसेच, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लस उत्पादन करण्यासाठी सीरम कंपनी प्रयत्नशील आहे.