ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 30 - फटाका मार्केटला आग लागून झालेल्या अग्नितांडव प्रकरणी अग्निशमन दलाचे प्रमुख शिवाजी झनझन यांना निलंबित करण्यात आले आहे. औरंगाबादच्या महापालिका आयुक्तांनी ही कारवाई केली.
शनिवारी सकाळी औरंगाबादमधील जिल्हा परिषद मैदानात असलेल्या फटाक्यांच्या स्टॉलना आग लागली होती. काही वेळातच भीषण रूप धारण करणाऱ्या या आगीत फटाक्यांचे 142 स्टॉल जळून खाक झाले होते. तसेच मैदानातील 100 हून अधिक दुचाकी, चार चाकी आणि रिक्षांचे या आगीत नुकसान झाले. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती. दरम्यान, अग्निशमन दलाच्या हलगर्जीपणामुळे ही आग भडकल्याचा आरोप करण्यात येत होता.
या अग्निकांडानंतर मैदानात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलाचे एकही वाहन तैनात नसल्याचे समोर आले होते. तसेच आगीचा भडका उडाल्यावर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी आल्याची तक्रार स्टॉलधारकांनी केली होती. अखेर औरंगाबाद मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी अग्निशमन दलाकडून झालेल्या हलगर्जीपणाची गंभीर दखल घेत अग्निशमन दलाचे प्रमुख शिवाजी झनझन यांना निलंबित केले.