मुंबई : दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरातील शनिवारी लागलेल्या भीषण आगीत गोकूल निवास या इमारतीचा तिसरा आणि चौथा मजला पूर्णपणे जळून खाक झाल्यानंतर ही इमारतच पूर्णपणे कोसळली. या दुर्घटनेनंतर अग्निशामक दलाचे सहाय्यक विभागीय अधिकारी एस. डब्ल्यू. राणे व केंद्र अधिकारी एम. एन. देसाई हे ढिगाऱ्याखाली सापडून मृत्युमुखी पडले. तसेच तीन जवानांसह एक पोलीस शिपाई आणि तीन रहिवासी जखमी झाले. पहाटेपर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. दुसऱ्या घटनेत विलेपार्ले येथील पद्मावती इमारतीच्या तेराव्या मजल्याला आग लागली. ही आग दोन तासांत आटोक्यात आली.शनिवारी सायंकाळी जुन्या हनुमान गल्लीतील या ३ क्रमांकाच्या इमारतीला आग लागली. या साठ वर्षे जुन्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कापडाचे गोदाम असल्याने आग वेगाने पसरली. अग्निशामक दलाच्या १७ फायर इंजिनसह आठ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. येथील गल्ल्याही अरुंद असल्याने आग विझवताना अडथळ्यांशी सामना करावा लागला. चार तास शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. त्यानंतर ही इमारत जमीनदोस्त झाली. यात अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी सुनील नेसरेकर, जवान एस.जी. अमीन हे दोन जवान तर पोलीस शिपाई मुकेश देशमुख (३१) परमेश्वर कनोजिया, त्रिवीदान मिस्त्रा आणि मनीष पगरी हे तीन रहिवासी जखमी झाले. जखपींपैकी काही जणांना गोकूळदास तेजपाल रुग्णालयात तर काहींना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यातील कनोजिया यांची प्रकृती गंभीर आहे. पहिल्या मजल्यावर बांधकामावेळी शॉर्टसर्किट झाल्याचा अंदाजही रहिवाशांनी वर्तवला. या इमारतीतील एका कुटुंबातील मुलीचे दोन दिवसांवर लग्न होते. मात्र आगीत लग्नासाठी जमा केलेले सर्व सामान जळून खाक झाले. विलेपार्ले येथील पद्मावती इमारतीच्या तेराव्या मजल्यावरील कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे सकाळी १०च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करीत दोन तासांत आग आटोक्यात आणली. आगीत इलेक्ट्रिक वायर, कागदपत्रे, पंखे जळून खाक झाले.
काळबादेवीतील आगीत अग्निशमन दलाचे २ अधिकारी शहीद
By admin | Published: May 10, 2015 4:01 AM