ठाणे : गेल्या वर्षी दिवाळीत झालेल्या आगीच्या घटनानंतर आता पुन्हा तशा घटना घडू नये, यासाठी ठाणे महापालिकेची अग्निशमन यंत्रणा सज्ज झाली आहे. दिवाळीत लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाने शहरातील पाचपाखाडी, ओवळा, दिवा, कळवा, शिवाजी मैदान, गावदेवी मैदान, पोखरण रोड नं. २, कोपरी या आठ भागांत तात्पुरती फायर स्टेशन्स उभारली आहेत. प्रतिसाद कालावधी कमी करण्यासाठी हा प्रयोग केल्याचे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले.गेल्या दिवाळीत आगीच्या सुमारे २५ घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये जिवीतहानी झाली नसली तरी, मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा तशा घटना घडू नयेत, यासाठी अग्निशमन यंत्रणा आधीपासूनच सज्ज झाली आहे. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दिवाळीच्या कालावधीसाठी हा तात्पुरत्या स्वरुपातील प्रयोग सुरु केला आहे. यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यास तिथले तात्पुरते फायर स्टेशन लगेच प्रतिसाद देईल. कर्मचारी वर्ग आणि अग्निशमन यंत्रणा तात्काळ पोहचू शकेल. प्रतिसाद कालावधी कमी करण्यासाठीच हा प्रयोग केल्याची माहिती अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी अरविंद मांडके यांनी ‘लोकमत’ला दिली. तात्पुरत्या अग्निशमन केंद्रामध्ये एक फायर इंजिन आणि पाच कर्मचारी कार्यरत ठेवण्यात आले आहेत. तसेच ओवळा आणि दिवा येथील केंद्र २४ तास कार्यरत ठेवण्यात आली असून उर्वरित सहा केंद्र दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीत कार्यरत ठेवण्यात आली आहेत. दिवाळीचा आनंद अबाधित ठेवण्यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)
दिवाळीसाठी फायर ब्रिगेड सज्ज
By admin | Published: October 23, 2014 3:58 AM