पुणे : शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांचे जळीतकांड सुरू असून सोमवारी कात्रज व सहकारनगर येथील तब्बल २९ वाहने जळून खाक झाली. काही दिवसांपूर्वीच डीएसके विश्व व कोथरूड भागातील सोसायट्यांमधील वाहने जाळल्यात आली होती. मागील काही महिन्यांपासून शहरात सोसायट्या किंवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. हे सत्र अद्याप थांबलेले नाही. मंगळवारी कात्रज चौकातील पीएमपी बसथांब्यानजिक गणेश पार्क सोसायटीमध्ये रात्री दोन ते अडीचच्या सुमारास वाहनांना आग लागली. यात १२ दुचाकी व २ चारचाकी तसेच सोसायटीतील वीजमीटर बोर्डही जळून खाक झाला. आगीची धग इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहचली होती. सोसायटीतील सुरक्षारक्षकाला आग लागल्याचे समजल्यानंतर त्याने आरडाओरडा केला. आग व धुरामुळे इमारतीतील रहिवाश्यांना खाली उतरता येत नसल्याने ते टेरेसवर पोहचले. अग्नीशामक दलालाही कळवण्यात आले. त्यांनी पंधरा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत दुचाकींचा अक्षरश: कोळसा झाला. दुर्घटनेत एक जण जखमी झाला आहे. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त आहेत. रात्रीच्या वेळी प्रवेशद्वार बंद असते. ही आग नेमकी कशी लागली याविषयी काहीच माहिती नाही, असे सोसायटीचे चेअरमन अंकुश बोबडे यांनी सांगितले.सहकारनगर पोलीस ठाण्यासमोरील जागेत असलेल्या वाहनांना दुपारी आग लागली. यामध्ये ३ रिक्षा , ९ चारचाकी, ३ दुचाकी वाहने आणि एक स्टॉल पूर्णपणे जळून खाक झाला. कोणतीही जीवितहानी झाली नाही . ही सर्व वाहने पोलिसांनी विविध गुन्ह्यांत तसेच बेवारस म्हणून ताब्यात घेतलेली होती. ही आग गवताने पेट घेतल्याने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.तपासासाठी पथकजळितकांडाचा तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक नेमण्यात आले आहे. डीएसके विश्व व कात्रज या दोन्ही घटनांचा तपास सुरू करण्यात आला आहे.- पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त, परिमंडल दोन
पुण्यात वाहनांचे जळीतकांड सुरूच
By admin | Published: March 30, 2016 12:30 AM