चिखलदरा (अमरावती) : उन्हाळा लागताच मेळघाटातील जंगलात मोठ्या प्रमाणात वणवा भडकतो. त्याला दोन दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. चिखलदरा नजीकच्या मोथा ते मडकी दरम्यान जंगलात आग लागली आहे. दोन दिवसात जवळपास शंभर हेक्टर जंगलाची राखरांगोळी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या घटांग वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या धामणगाव गढी राऊंडमधील मडकी बीटमध्ये आग लागली आहे. परतवाडा ते धामणगाव गढी मार्गे चिखलदरा या रस्त्यावरच असलेल्या मडकी गावानजीकच्या जंगलात आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होण्यासोबतच सरपटणाऱ्या प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती वर्तविली जात आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत मोठ्या प्रमाणात जाळरेषेचे काम झाल्यावरही अगदी रस्त्यावरून एक किमी अंतरापर्यंत जंगलात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या आगीमुळे घटांग वनपरिक्षेत्र अंतर्गत कामात अनियमितता झाली का, याचा तपास होणे गरजेचे ठरले आहे.
आग विझवण्याचे कार्य सुरू वनकर्मचारी, अंगारी दोन दिवसांपासून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी हवेच्या वेगाने जंगल जळत असल्याचे चित्र आहे. बुधवारी दुपारी २ वाजता परिसरात आग विझवताना एकही कर्मचारी आढळून आला नाही. यासंदर्भात संबंधित अधिकाºयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
चुकीचा फटका घटांग येथून मडकीचे ३५ किलोमीटर आहे. नुकत्याच झालेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प व प्रादेशिक वनविभागाच्या सीमारेषा निर्धारणात चिखलदरा परिक्षेत्रात असलेले मडकी, धामणगाव गढी हे घटांग परिक्षेत्रात टाकण्यात आले. या चुकीचा फटका आगीच्या रूपाने बसल्याचा आरोप निसर्गप्रेमींनी केला आहे. दुसरीकडे वनपरिक्षेत्र अधिकाºयांसह वनकर्मचारी परतवाडा, अमरावती येथून ये-जा करीत असल्याने आगीवर त्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.