पुणे : शत्रू, शॉटगन अशा नावाने आणि बिहारी शैलीतील डायलॉगबाजीने परिचित असलेले आणि रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेले शत्रुघ्न सिन्हा आपल्याच चित्रपटातील डायलॉग ऐकून भावूक झाल्याचे पुणेकरांनी अनुभवले. निमित्त होते सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचे.सांस्कृतिक महोत्सवाला गुरुवारी शत्रुघ्न सिन्हा यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. उद्घाटन सोहळ्यास सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, आरती प्रधान, ज्येष्ठ पत्रकार आरती पाडगावकर, ब्रिगेडिअर राजीव दिवेकर व्यासपीठावर होते. शत्रुघ्न सिन्हा यांच्या ‘एनिथिंग बट खामोश’ या आत्मचरित्राचे प्रकाशन डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले. शत्रुघ्न सिन्हा यांचा परिचय देण्यासाठी सिन्हा यांचे चित्रपटातील काही प्रसंग चित्रफितीद्वारे दाखविण्यात येत होते. ‘जली को आग कहते है, बुझीको राख’ हा डायलॉग जसा टाळ्या मिळवून गेला, त्यामुळे ते सुखावले; पण त्या काळातील आठवणींमध्ये काही क्षण रमूनही गेले. कुणाचे लक्ष जात नाही, असे पाहून त्यांनी रुमालाने डोळेही टिपले. यंदाचा सिंबायोसिस सांस्कृतिक पुरस्कार संगीतकार आणि धारावी रॉक्स बॅँडचे संस्थापक अभिजित जेजुरीकर यांना देण्यात आला. या वेळी हिप-हॉप, फोल्क म्युझिक, आफ्रिकन म्युझिक सादर करण्यात आले. त्यानंतर आशा भोसले यांच्या गाजलेल्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. स्वप्नजा लेले, योगिता गोडबोले, सई टेंबेकर, अभिषेक मारोटकर यांनी गीते सादर केली. सचिन जांभेकर यांचे संगीत संयोजन होते. (प्रतिनिधी)
जली को आग कहते है..!
By admin | Published: January 22, 2016 1:41 AM