रत्नागिरी : रत्नागिरी विभागीय कार्यालयातील रोकड विभागाला गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. या आगीत तिकीट यंत्रे (इटीएम- इलेक्ट्रॉनिक तिकिटींग मशीन), चार्जर, वे बिल गठ्ठा, तिकीट रोल भस्मसात झाले आहेत. ११४ तिकीट यंत्रे बाद झाली असून, मशीनअभावी दीड लाखाचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे शुक्रवारी सकाळच्या सत्रात तब्बल १९0 बसफेऱ्या ठप्प झाल्या.राज्य परिवहन महामंडळाच्या माळनाका येथील रत्नागिरी विभागीय कार्यालयाच्या मुख्य इमारतीच्या मागे असलेल्या रोकड विभागाच्या इमारतीतून धूर येत असल्याचे गुरुवारी मध्यरात्री ३.१५ वाजता सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याने तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. नगरपालिकेचा अग्निशमन बंब पाचारण करण्यात आला. त्याद्वारे आग विझविण्यात आली.गेली दोन वर्षे तिकीट ट्रेचा वापर बंद आहे. ग्राहकांना तिकीट यंत्राद्वारे तिकिटे देण्यात येतात. या यंत्रांना बॅटरीज् असल्याने ते चार्जिंगला लावण्यात येतात. आगारात २२३ यंत्रे आहेत. त्यापैकी ११४ यंत्रे चार्जिंगला लावण्यात आली होती. ती या आगीत बाद झाली आहेत. शिवाय चार्जर बॉक्स, शेजारी असलेले वे बिल गठ्ठे, तिकीट रोल जळाले आहेत. त्यामुळे महामंडळाचे एकूण पाच लाखांचे नुकसान झाले आहे. तिकीट यंत्रे नसल्यामुळे सकाळी ४.३० वाजल्यापासून ड्युटीवर हजर असलेल्या चालक-वाहकांना बसून रहावे लागले. सकाळी ६.३० वाजता एक संगणक रत्नागिरी आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात सुरू करण्यात आला. संगणकाद्वारे अपडेट घेऊन वाहकांना तिकीट ट्रे देण्यात आले. त्यानंतर एकेक फेऱ्या सुरू करण्यात आल्या. सकाळी ६.३० वाजता बोरीवली, पुणे गाड्या सोडण्यात आल्या. सकाळी लांब पल्ल्याच्या, तालुक्यातून आलेल्या गाड्या रत्नागिरी आगारात दाखल झाल्यानंतर ती तिकीट यंत्रे वापरासाठी घेण्यात आली. तिकीट यंत्रांअभावी रत्नागिरी ग्रामीण, शहरी मार्गावरील फेऱ्या बंद होत्या. सकाळच्या सत्रात १९० फेऱ्या न गेल्यामुळे ४ हजार ४४० किलोमीटरच्या फेऱ्या रद्द झाल्या. परिणामी महामंडळाचे दीड लाखाचे नुकसान झाले. (प्रतिनिधी)ड्युटीवर असूनही गैरहजेरीवाहक, चालक नेहमीप्रमाणे सकाळपासून ड्युटीवर हजर होते. मात्र तिकीट यंत्रे बाद झाल्यामुळे व तिकीट ट्रे उपलब्ध नसल्यामुळे वाहक, चालकांना बसून रहावे लागले. संगणकावर तिकीट ट्रेचे अपडेट घेऊन तिकीट ट्रे वाहकांच्या ताब्यात देण्यात येत होते. परंतु फेऱ्या जाऊ न शकलेल्या चालक, वाहकांची हजेरी प्रशासनाकडून लावून घेण्यात असमर्थता दर्शविण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. कर्मचाऱ्यांची चुकी नसताना अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमधून उमटत होत्या. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे रत्नागिरी आगार सचिव बी. ए. विश्वासराव यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन हजेरी लावण्याची विनंती केली आहे.चार्जींगला लावून ठेवण्यात आलेली तिकीट यंत्रे जळून खाक झाली.आगीचे कारण गुलदस्त्यातशॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याबाबत एस्. टी.चे अधिकारी चौकशी करीत आहेत.
रत्नागिरी आगारातील रोकड विभागाला आग
By admin | Published: December 25, 2015 11:07 PM