मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात फटाके फोडण्यासाठी रात्री ८ ते १० ची ठरवून दिलेली वेळ धुडकावून लावत मुंबई-ठाण्यासह सर्व परिसरात रात्री उशिरापर्यंत धडाडधूम सुरू असल्याचे चित्र पाडवा आणि भाऊबिजेला दिसले. प्रत्येक गल्लीबोळात पोहोचणे शक्य नसल्याचे सांगत पोलिसांनी कारवाई होत नसल्याच्या आरोपांना उत्तर दिले. दरम्यान, नियम मोडल्याप्रकरणी आठ जणांना अटक केली असून शंभराहून अधिकव्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील अनेकांकडून दंड वसूल करण्यात आला. बेकायदा फटाकेविक्रेत्यांवरही गुन्हे दाखल झाले आहेत.ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात बुधवारी पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर विविध पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाईला वेग आला. मात्र मुंबईचे दोन्ही जिल्हे, ठाणे, पालघर, रायगडया जिल्ह्यांतील कारवाईची एकत्रित आकडेवारी पोलिसांकडे उपलब्ध नव्हती. ‘कारवाई सुरू आहे.एकत्र माहिती मिळाली, की देऊ’ असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.वारंवार बजावल्यानंतही रात्री १० नंतर फटाके फोडत असल्याने पोलिसांनी मुंबईत मरिन लाईन्स परिसरात सात जणांकडून दंड वसूल केला. त्यापाठोपाठ परिमंडळ ४ अंतर्गत ३७ ते ४० गुन्हे दाखल झाले आहेत. यात आर. ए. के. मार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत पाच गुन्हे दाखलअसून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील विविधपोलीस ठाण्याअंतर्गतही कारवाई सुरु आहे.रात्री उशिरापर्यंत मुंबईत जवळपास १०० गुन्हे दाखलझाल्याचे समजते. या कारवाईमुळे पोलीस आणि नागरिकांत वादही झाले.पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाई सुरु आहे. पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच पोलीस नियंत्रण कक्षातील सीसीटीव्हीच्या माध्यमांतून सर्व घटनांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत, असे वरिष्ठ अधिकाºयांनी स्पष्ट केले.बेकायदा स्टॉलवर गुन्हेवसई : पालघर जिल्ह्यात विनापरवाना फटाक्यांचे स्टॉल लावणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वसई, विरार, माणिकपूर, अर्नाळा आणि तलासरी पोलीस हद्दीतील १४ स्टॉल विक्रेत्यांवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या कारवाईत पोलिसांनी एक लाख ६६ हजार रु पयांचे फटाके जप्त करून संबंधित १४ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाडा येथे फटाके विक्री करणाºया चार घाऊक विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून मंगळवारी त्यांची दुकाने सील करण्यात आली.नवी मुंबईत तीन एफआयआरनवी मुंबई : फटाके फोडण्यासंदर्भात न्यायालयाने आखून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात तीन गुन्हे व ३४ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक १३ अदखलपात्र गुन्हे कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत.परिमंडळ एकमध्ये १३ अदखलपात्र, तरपरिमंडळ दोनमध्ये ३ एफआयआर व २१ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे.सहा महिने शिक्षा होऊ शकतेठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात संबंधित व्यक्तीला सहा महिन्यांची शिक्षेची तरतूद आहे. तसेच या गुन्ह्यात सुरुवातीला पोलिसांद्वारे नोटीस बजावली जाते. हा गुन्हा जामीनपात्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, नागरिकांनी न्यायालयाचा आदेश पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.
फटाकेबंदीचा फुसका बार, उशिरापर्यंत आतषबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 6:50 AM