पुणे : सकाळी पुणे ते सातारा असणाऱ्या मार्गावर पुण्यातील जुन्या कात्रज बोगद्याजवळ एसटी बसने पेट घेतल्याची घटना घडली. पुणे अग्निशमन दलाचे जवान योगेश चव्हाण यांनी ड्युटीवरुन सुटून जात असताना ही घटना पाहिली व तत्परतेने आपले कर्तव्य चोख बजावत एसटीला लागलेली आग तर विझवली. आणि एकोणीस प्रवासी सुदैवाने सुखरुप बचावले.
सकाळी आठच्या सुमारास कोथरुड अग्निशमन केंद्रात रात्रपाळीत ड्युटी बजावणारे मुळ साताऱ्याचे रहिवाशी असलेले चव्हाण कामावरुन सुटून आपल्या दुचाकीवर सुट्टीकरिता घरी जात होते. कात्रजच्या जुन्या बोगद्याजवळ पुणे ते महाबळेश्वर या एसटी बसच्या केबिनमधे आग लागल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी तातडीने आपल्या अग्निशमन दलाची मदत ही मागविली. त्याचवेळी प्रवासी घाबरले होते. प्रवाशांना धीर देत बाहेर घेऊन प्रथम रस्त्यालगत असणाऱ्या वाळूचा वापर करुन आग विझवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतू, वाळूच्या कमतरतेने आग विझवणे कठीण होत आहे हे लक्षात आल्यावर एका चारचाकी वाहनाला थांबवून त्यांनी त्यामधील फायर एक्शि्टिगंविशर वापरुन आग पुर्ण विझवली.
आग विझताच एसटी चालक वाहक व प्रवासी यांनी सुटकेचा श्वास घेत जवान योगेश चव्हाण यांचे आभार मानले. त्याचवेळी कात्रज अग्निशमन केंद्राचे वाहन ही दाखल होऊन त्यांनी पुढील काम पार पाडले. आगीचे कारण नेमके समजू शकले नाही. सध्या चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.